Upcoming IPOs: भारतीय आयपीओ मार्केटमध्ये तेजी; MobiKwik पासून Paradeep Phosphates पर्यंत तुम्ही या Top 3 कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता
IPO | Representative Image (Photo Credits: Pixabay)

भारताच्या आयपीओ (IPO) बाजारात या वर्षी प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपन्यांनी आयपीओमधून (IPO) विक्रमी निधी गोळा केला आहे. हा आकडा गेल्या 20 वर्षांतील सर्वाधिक आहे. हे वर्ष संपायला अजून तीन महिने बाकी आहेत व जर का आयपीओ बाजाराची गती अशीच राहिली तर हे वर्ष विक्रमी ठरेल. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बीएसईचा सेन्सेक्स 60,000 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. तिसऱ्या तिमाहीतही निर्देशांकाने गती कायम ठेवली आहे. सोमवारी, सकाळच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 60,300 च्या वर गेला होता, दुसरीकडे एनएसईचा निफ्टी सोमवारी 18,000 वर पोहोचला.

अशा प्रकारे भारतीय शेअर बाजार पूर्ण बहरात आहे. या संधीची दखल घेत, अनेक खाजगी कंपन्या लवकरच सार्वजनिक होण्याचे आणि त्यांचे आयपीओ बाजारात आणण्याची योजना आखत आहेत. 2022 मध्ये अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ सुरू करण्याची योजना आखत आहेत. अहवालांनुसार, येत्या काही महिन्यांत 30 हून अधिक कंपन्या त्यांचे आयपीओ उघडण्याची शक्यता आहे. पेटीएम, नायका, पॉलिसीबाजारसह अनेक कंपन्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. अहवालात असे म्हटले आहे की, नायकाची लोकांकडून 4,000 कोटी रुपये जमवण्याची अपेक्षा आहे, तर पॉलिसीबाजार आपल्या आयपीओमधून 6,000 कोटी उभे करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. आयपीओ गुंतवणूकदारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. अशाप्रकारे सुमारे 13 कंपन्यांच्या आयपीओला बाजार नियामक सेबीची मान्यता मिळाली आहे.

भविष्यात जर का तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणुक करायची असेल तर तुम्ही पुढील तीन आयपीओचा विचार करू शकता.

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक -

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेने इनिशिअल पब्लिक ऑफरद्वारे सुमारे 998 कोटी रुपये उभारण्यासाठी कॅपिटल मार्केट रेगुलेटर सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. यामध्ये, 800 कोटी रुपयांचे नवीन शेअर्ससह विद्यमान शेअरहोल्डर्सद्वारे सुमारे 198 कोटी रुपयांचे शेअर्स विकले जातील.

मोबिक्विक आयपीओ (MobiKwik IPO) -

मोबिक्विकचा आयपीओ हा अजून एक महत्वाचा व बहुप्रतिक्षित आयपीओ आहे. या आयपीओद्वारे 1,900 कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडून कंपनीला अलीकडेच ग्रीन सिग्नल मिळाला आहे. अहवालांनुसार, डिजिटल पेमेंट कंपनी नवीन शेअर्सच्या इश्यूमधून 1,500 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. सिकोइया कॅपिटल आणि बजाज फायनान्स लिमिटेडची मोबिक्विकमध्ये मोठी गुंतवणूक आहे. या कंपनीची थेट स्पर्धा व्हॉट्सअॅप पे, गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या पेमेंट अॅप्सशी आहे. (हेही वाचा: Indian Education System: भारतातील केवळ 19% शाळांमध्येच Internet ची उपलब्धता; जाणून घ्या UNESCO चा धक्कादायक अहवाल)

Paradeep Phosphates IPO -

देशातील आघाडीच्या खत कंपनीपैकी एक, Paradeep Phosphates ला अलीकडेच SEBI कडून त्याचा IPO उघडण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. कंपनी आपल्या शेअर्समधून 12.6 अब्ज रुपये उभारण्याचा विचार करत आहे. पारादीप फॉस्फेट सध्या डि-अमोनियम फॉस्फेट (DAP) आणि एनपीके फर्टिलायझर्स सारख्या विविध खतांची निर्मिती, व्यापार, वितरण आणि विक्री करते.