Lata Mangeshkar Passes Away: लता दीदींच्या निधनाने देशात 2 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा; जाणून घ्या राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय असतं?
Lata Mangeshkar | PC: Twitter

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज (6 फेब्रुवारी) मागील 28 दिवसांची आजारपणाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डो. प्रतिथ सामदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्टी ऑर्गन फेल्युअर मुळे त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं निधन ही भारतातील कधीही भरून न निघणारी पोकळी असल्याचं म्हणत आपलं दु:ख व्यक्त केले आहे. भारत सरकार कडून लता दीदींच्या निधनानंतर 2 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा देशभरात जाहीर करण्यात आल्याचे म्हटलं आहे. आज 6 फेब्रुवारी आणि उद्या 7 फेब्रुवारी दिवशी हा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे.

राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता दोन दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला आहे. अशाप्रकारे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करणं हे त्या व्यक्तीच्या निधनाने देशाच्या झालेल्या नुकसानाचं symbolic gesture समजलं जातं. हा राष्ट्रीय दुखवटा देशातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या निधनानंतर जाहीर करण्याची पद्धत आहे. तसेच तो जाहीर करण्याचा निर्णय केवळ देशाच्या राष्ट्रपतींकडे असतो. राज्यस्तरावर दुखवटा जाहीर करण्याचा अधिकार राज्याकडे असतो.

राष्ट्रीय दुखवटा चा प्रोटोकॉल काय असतो?

    • ध्वजसंहितेनुसार राष्ट्रीय दुखवटा काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. सार्‍या शासकीय इमारतीमध्ये हा नियम पाळला जातो.
    • राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय फक्त राष्ट्रपती घेतात.
    • राष्ट्रीय दुखवटा काळामध्ये कोणतेही ऑफिशिएल एंटरटेन्मेंटचे केले जाऊ शकत नाहीत.
    • सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते.
    • शासकीय सन्मान प्राप्त व्यक्तीचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात येते.

      अंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते.

लता मंगेशकर यांना 2001 साली भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन सन्मानित करण्यात आले होते. लता दीदींवर आज संध्याकाळी 6.30 च्या सुमारास शिवाजी पार्क मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार होतील असे आदेश दिले आहेत.