पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office) सुरु करण्यात आलेल्या 9 बचत योजनांपैकी किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही एक योजना आहे. बचतीसाठी ही एक उत्तम योजना असल्याचे मानले जाते. या योजनेत पैसे गुंतवल्याने 10 वर्ष 4 महिन्यांच्या (124 महिने) कालावधीत ते दुप्पट होतात असा दावा करण्यात आला आहे. योजनेच्या नावावरुन ही केवळ शेतकऱ्यांसाठी असेल, असे वाटते. मात्र यात कोणीही पैसे गुंतवू शकतात. या स्किम अंतर्गत तुम्ही कमीत कमी 1000 रुपये गुंतवून KVP सर्टिफिकेट विकत घेऊ शकता. मात्र यात तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष 4 महिन्यांसाठी पैसे गुंतवावे लागतील. तसंच कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रुपये तुम्ही या योजनेत गुंतवू शकता. 50,000 रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूकीसाठी पॅन कार्ड डिटेल्स देणे आवश्यक आहे.
किसान विकास पत्र योजनेबद्दल माहिती:
KVP इंटरेस्ट आणि रिटर्न:
किसान पत्र योजनेत सध्याचा व्याजदर 6.9% इतका आहे. या योजनेत गुंतवलेली रक्कम 10 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होईल, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे 124 महिन्यांनंतर गुंतवणूकदाराला दुप्पट पैशांचा लाभ मिळेल.
मॅच्युरीटी:
सध्याच्या व्याजदरावरुन मॅच्युरीटीची रक्कम मोजली जाते. KVP सर्टिफिकेटवर ती रक्कम नमूद केली जाते. त्यामुळे व्याजदर बदलला तरी मॅच्युरीटीच्यावेळी गुंतवणूकदाराला मिळणाऱ्या पैशांवर त्याचा परीणाम होत नाही. परिणामी, व्याजदर जरी पडला तरी KVP सर्टिफिकेटवर नमूद केलेली रक्कम गुंतवणूकदाराला मिळते. म्हणूनच किसान विकास पत्र योजना ही गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो.
पात्रता:
18 वर्षांवरील भारतीय नागरिक या योजनेत पैसे गुंतवू शकतो. अगदी ज्येष्ठ नागरिक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अगदी अल्पवयीन मुलंही या योजनेत गुंतवणूक करुन KVP सर्टिफिकेट मिळवू शकतात. परंतु, त्यांचे खाते एखादी प्रौढ व्यक्ती हाताळेल. तसंच सर्टिफिकेट देखील पालक किंवा मार्गदर्शन करणारी व्यक्ती घेईल. मात्र केवळ भारतात राहणारी व्यक्ती KVP सर्टिफिकेट विकत घेऊ शकते. भारतात न राहणाऱ्या व्यक्ती यात योजनेत पैसे गुंतवू शकत नाहीत. या योजनेचा लाभ एखादी ट्रस्ट घेऊ शकते. मात्र कोणत्याही कंपनीसाठी ही योजना खुली नाही.
पैसे काढणे
स्कीम मॅच्युअर होण्यापूर्वी तुम्ही यातून पैसे काढू शकता. परंतु, KVP सर्टिफिकेट खरेदी केल्यानंतर एका वर्षातच तुम्ही यातून पैसे काढले तर तुम्हाला व्याज तर मिळणारच नाही. याउलट पेन्लटीही भरावी लागेल. जर तुम्ही एक ते अडीच वर्षात पैसे काढल्यास तुमचा व्याज कमी होईल. पण पेन्लटी भरावी लागणार नाही.
किती पैसे गुंतवू शकता?
KVP ही सरकारी योजना असल्याने त्यात पैसे गुंतवणूक करणं सुरक्षित आहे. तुमच्या गुंतवणूकीनुसार तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाते. यात तुम्ही कमीत कमी 1000 रुपये गुंतवू शकता. 50,000 रुपयांवरील गुंतवणूकीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही यात तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांच्या नावाने सर्टिफिकेट घेऊ शकता. तसंच दुसऱ्या व्यक्तीसह संलग्न सर्टिफिकेटही काढू शकता. या योजनेत व्याजदर हा अर्थमंत्रालयाकडून ठरवण्यात येतो.
KVP सर्टिफिकेट कोण घेऊ शकतं?
# प्रौढ व्यक्ती
# जॉईन्ट ए अकाऊंट (जास्तीत जास्त 3 प्रौढ व्यक्ती)
# जॉईन्ट बी अकाऊंट (जास्तीत जास्त 3 प्रौढ व्यक्ती)
# 10 वर्षांवरील अल्पवयीन मुलं.
# अल्पवयीन मुलांच्या वतीने प्रौढ व्यक्ती.
# गतीमंद मुलांच्या वतीने पालक, मार्गदर्शक.
गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून किसान पत्र योजनेकडे पाहिले जाते. तसंच यातून मिळणारा लाभ आणि योजनेचे नियम पाहता अगदी सामान्य व्यक्तीही यात सहज गुंतवणूक करु शकते.