भारताच्या इतिहासात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना आयर्न लेडी म्हणून ओळखले जाते, तर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. आज इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे, तर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली होती, मात्र आजपर्यंत इंदिराजींच्या हत्येवरून पडदा उठलेला नाही. इंदिरा गांधी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, परंतु हे कोणी? आणि कशासाठी? घडवून आणले याबाबत अजूनही खुलासा झाला नाही.
गोळीबारानंतर जेव्हा इंदिराजी हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा त्यांना तब्बल 80 बाटल्या रक्त चढवले होते, मात्र काहीच फायदा झाला नाही. गोळीबारानंतर 4 तासांनंतर म्हणजेच दुपारी 2 वाजून 23 मिनिटांनी इंदिरा गांधींना मृत घोषित करण्यात आले. आज त्यांच्या स्मृतीदिनी चला पाहूया नक्की काय घडले त्या दिवशी
ओडिशामधील प्रचाराच्या दगदगीनंतर इंदिरा गांधी 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दिल्लीला पोहोचल्या होत्या. दुसऱ्या दिवशी दिग्दर्शक पीटर उस्तीनोव यांच्यासोबत त्यांची पहिली मिटिंग होती. त्यानंतर दुपारी ब्रिटनचे माजी पंतप्रधान जेम्स कॅलघन आणि मिझोरमचे एक नेते त्यांना भेटणार होते. सायंकाळी ब्रिटनच्या राजकन्या अॅनसोबत त्यांचं भोजन नियोजित होते. अशा प्रकारे 31 ऑक्टोबरचा कार्यक्रम ठरला होता. 30 ऑक्टोबर रोजी त्या जाग्याच होत्या. सोनियाजींनी त्यांना पहाटे 4 वाजता जागे असलेले पाहिले होते. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी इंदिराजी नेहमीप्रमाणे उठल्या. सकाळी साडेसात वाजता तयार होताना काळ्या काठाची केशरी साडी त्यांनी परिधान केली. त्यानंतर नाश्ता आणि थोडाफार मेकअप करून त्या 9.10 वाजता बाहेर आल्या.
इंदिराजींच्या मागे मागे आर. के. धवन आणि त्यांच्या मागे इंदिरा गांधीचे खासगी कर्मचारी नाथू राम होते. तर सर्वांत मागे त्यांचे खासगी सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर दयाल होते. धवन यांच्याशी चर्चा करत असताना अचानक सुरक्षा कर्मचारी बिअंतसिंगने बंदूक काढून इंदिरा गांधींवर गोळी झाडली. इंदिराजी कोसळल्या. दुसरीकडे सतवंतसिंगही हातात गन घेऊन उभा होता, तो थोडा गोंधळला मात्र त्यानंतर त्यांने एका मागून एक अशा 25 गोळ्या इंदिराजींच्या शरीरावर झाडल्या. झाडलेल्या गोळ्या त्यांच्या बगलेत, छातीत आणि कमरेत लागल्या. (हेही वाचा: Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2019: सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून का साजरा केला जातो?)
त्याच वेळी नेहमीप्रमाणे दारात उभी असणाऱ्या रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर हजार नव्हता, हे पाहून आर. के. धवन आणि दिनेश भट्ट यांनी इंदिरा गांधींना उचलून अॅम्बेसिडर कारमध्ये घातले. त्याचवेळी सोनियाजी धावत आल्या, इंदिराजींचे डोके मांडीवर घेऊन त्या गाडीत बसल्या व गाडी एम्सकडे धावू लागली. गाडी एम्सला पोहोचताच काही मिनिटामध्ये डॉ. गुलेरिया, डॉ. एम. एम. कपूर आणि डॉ. एस. बालाराम तिथे धावत आले. एलेक्ट्रोकार्डियोग्राममध्ये इंदिरांच्या हृदयाची हालचाल जाणवत होती, एक डॉक्टर त्यांना ऑक्सिजन पुरवत होते तर दुसरे नाडी शोधत होते. त्यानंतर त्यांना तब्बल 80 बाटल्या रक्त चढवण्यात आले मात्र काहीच फायदा झाला नाही.
त्यावेळची त्यांची स्थिती म्हणजे त्यांच्या यकृतात गोळी लागली होती, मोठ्या आतडीत 12 गोळ्या लागल्या होत्या, लहान आतड्यांना गंभीर इजा झाली होती, त्यांच्या फुप्फुसात गोळी लागली होती, गोळी लागून बरगडीचे हाड मोडले नाही म्हणायला फक्त त्यांचे हृदय सुस्थितीमध्ये होते. त्याच्या शरीरावर 30 गोळ्यांच्या खुणा होत्या, तर एकूण 31 गोळ्या इंदिराच्या शरीरातून काढण्यात आल्या होत्या. अखेर दुपारी 2.23 वाजता इंदिरा गांधी यांना मृत घोषित करण्यात आले.