सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती आणि राष्ट्रीय एकात्मता दिवस
वल्लभभाई पटेल यांची जयंती ताष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरं करण्यामागील देखील कारण तितकेच खास आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री आणि उप पंतप्रधान पद सोपावण्यात आले होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस भारत - पाकिस्तान फाळणी करण्यात आली होती. त्यामुळे भारताच्या अनेक राज्यांमध्ये हिंसाचार पेटला होता. अशावेळेस शांतता प्रस्थापित करण्यासाठी वल्लभभाई पटेल यांनी मदत केली. त्यांच्या या योगदानासोबतच सुमारे 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेण्याचं शिवधनुष्य देखील त्यांनी पेललं आहे. त्यामुळे बुद्धी चातुर्य, चाणाक्षपणा आणि प्रसंगी सैन्य वापरून त्यांनी भारत अखंड ठेवला. त्यामुळे भारताचे लोह पुरूष अशी ओळख असणार्या सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जन्मदिन आजही 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा केला जातो. भारत देशाला एकसंध ठेवण्यात मोलाची कामगिरी करणार्या या गुजरातच्या सुपुत्राला भारतीय स्त्रियांनी 'सरदार' अशी उपाधी बहाल केली आहे.
यंदा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधत नरेंद्र मोदी देखील गुजरातला पोहचले आहेत. काही खास कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत. पेशाने वकील असणार्या वल्लभभाई पटेल महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते. त्यांच्या देशाच्या राजकारण आणि समाजकारण यांच्यामध्ये आपलं आयुष्य व्यतित केलं. 1950 साली त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. 1991 साली भारत सरकारने त्यांचा गौरव मरणोत्तर भारत रत्न देऊन केला.