स्टॅच्यू ऑफ युनिटी : सरदार पटेलांचा 182 मीटर उंचीचा पुतळा तयार ; ही आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये
स्टॅच्यू ऑफ युनिटी (Photo Credit- PTI)

नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर जगातील सर्वात उंच पुतळ्याची उभारणी झाली आहे. सरदार वल्लभ भाई पटेलांचा हा पुतळा असून त्याची उंची 182 मीटर इतकी आहे. आता या प्रतिमेच्या फायनल फिनिशिंगचे काम चालू आहे. हा पुतळा वडोदराजवळच्या नर्मदा जिल्ह्यात असलेल्या सरदार सरोवर बांधावर उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑक्टोबरला या पुतळ्याचे अनावरण करतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींची अशी इच्छा होती की, सरदार पटेलांचा असा पुतळा उभारावा ज्याची उंची सर्वाधिक असेल. लवकरच पंतप्रधानांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

या पुतळ्याला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' असे नाव देण्यात आले आहे. जाणून घेऊया या पुतळ्याबद्दलच्या काही खास गोष्टी...

# ही जगातील सर्वात उंच प्रतिमा आहे. या पुतळ्यानंतर चीनच्या स्प्रिंग बुद्धाचा पुतळा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची उंची 128 मीटर आहे. तर न्युयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची उंची 93 मीटर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी ही बांधाच्या 7 किमी अंतरावरुनच नजरेस पडेल.

# पुतळ्याच्या चेहऱ्यावरील डिझाईन तयार करण्यासाठी सरदार वल्लभ भाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टच्या 10 लोकांची समिती बनवण्यात आली. समितीच्या अनेक प्रयत्नांनंतर चेहऱ्याचे डिझाईन ठरले. पुतळ्याचा चेहरा जवळपास 30 फुटांचा आहे.

# या पुतळ्याच्या आत लिफ्ट आहे. या लिफ्टमुळे पर्यटक सरदार पटेलांच्या हृदयापर्यंत जाऊ शकतील. येथून बांधाशिवाय नर्मदा नदीची 17 किमी लांबीच्या किनाऱ्यावर असलेला फुलांचा बगिचा तुम्ही पाहु शकाल. त्याचबरोबर तेथील गॅलरी पर्यटकांना पाहण्यास खुली असेल.

# सरदार वल्लभ भाई पटेलांच्या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. कारण गुजरात विधानसभेत 182 सीट आहेत.

# स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी पाच वर्ष लागले. सर्वात कमी वेळात उभारण्यात आलेला इतका मोठा आणि खास असलेला हा पहिलाच पुतळा आहे.

# प्रतिमा बनवण्यासाठी 2,989 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पुतळा उभारण्यासाठी 4,076 कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे. त्यापैकी 200 कर्मचारी चीनचे होते.

# हा पुतळा भूकंपरोधी आहे. चीफ इंजिनियरनुसार, प्रतिमेची निर्मिती भूकंपरोधी टेक्नीकने बनवण्यात आली आहे. या पुतळ्यावर 6.5 तीव्रतेचा भूकंप आणि 220 किमी प्रती तास इतका हवेचा वेगाचा काहीही परिणाम होणार नाही. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 237.35 मीटर आहे.

# या पुतळ्याची अजून एक खासियत म्हणजे हा पुतळा गंजणार नाही. शिल्पकार राम सुथार यांनी सांगितले की, "हा पुतळा सिंधू घाटी सभ्यतेच्या समकालीन कलेनुसार बनवला आहे. यात चार धातुंचे मिश्रण आहे. यामुळे पावसातही हा पुतळा गंजणार नाही. पुतळ्यासाठी 85% तांब्याचा वापर करण्यात आला आहे."