ICICI Bank Home Loan: घर विकत घेणाऱ्यांसाठी खुशखबर; SBI, HDFC, kotak Mahindra नंतर आता 'आयसीआयसीआय' बँकेने कमी केले गृह कर्जाचे व्याज दर
ICICI Bank Name and Logo (Photo Credit: ANI)

बर्‍याच बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गृह कर्जाच्या (Home Loan) दारात कपात केली आहे. आता खासगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआयसुद्धा (ICICI) यामध्ये सामील झाली आहे. एसबीआय, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसीनंतर आता आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांसाठी गृहकर्ज स्वस्त केले आहेत. आयसीआयसीआय बँकेने शुक्रवारी मर्यादित कालावधीसाठी गृह कर्जावर 6.70 टक्के व्याज दर जाहीर केले. एसबीआय 6.70 टक्के, कोटक महिंद्रा बँक 6.65 टक्के आणि एचडीएफसी बँक 6.75 टक्के गृहकर्ज देत आहे. आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे की गृह कर्जावरील नवीन व्याजदर 31 मार्चपर्यंत उपलब्ध असतील आणि गेल्या दशकात हा सर्वात कमी व्याज दर आहे.

आयसीआयसीआय बँकेचे नवीन दर आजपासून (5 मार्च 2021) लागू झाले असून 75 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावरील व्याज दर 6.70 टक्के आहे. त्याचबरोबर 75 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जाचे दर 6.75 टक्के निश्चित केले आहेत. बँकेचे म्हणणे आहे की जे लोक बँकेचे ग्राहक नाहीत ते वेबसाइट आणि अॅपवर त्वरित कर्जासाठी डिजिटल अर्ज करू शकतात. खरेदीदारांना डिजिटल पद्धतीने कर्जाची त्वरित मान्यता मिळेल. याशिवाय तुम्ही जवळच्या आयसीआयसीआय बँक शाखेतून गृह कर्जासाठी अर्ज करू शकता.

आयसीआयसीआय बँकेचे प्रमुख रवि नारायणन म्हणाले, ‘ज्या ग्राहकांना वापरासाठी घर घ्यायचे आहे अशा लोकांकडून गेल्या काही महिन्यांत गृह कर्जाची मागणी वाढत आहे. आम्हाला विश्वास आहे की कोणत्याही व्यक्तीसाठी स्वप्नातील घर विकत घेण्याची ही एक योग्य संधी आहे कारण याक्षणी व्याज दर खूपच कमी आहे. आमचा विश्वास आहे की आमची पूर्णपणे डिजिटल होम लोन प्रक्रिया कोणालाही सोयीची ठरणार आहे.’ (हेही वाचा: चेक बाऊंस प्रकरणी मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारला विशिष्ट कालावधीसाठी अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याचा कायदा करण्याची SC ची सूचना)

नोव्हेंबर 2020 मध्ये बँकेने गृह कर्जाच्या पोर्टफोलिओमध्ये 2 लाख कोटींचा आकडा पार केला. आयसीआयसीआय बँक हा डेटा प्राप्त करणारी पहिली खासगी क्षेत्रातील बँक बनली आहे. रिझर्व्ह बँकेने पॉलिसीचे दर अत्यंत खालच्या पातळीवर आणले आहेत. यामुळे बँकांना व्याजदर कपात करणे सोपे झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निश्चित केलेला रेपो दर सध्या 4 टक्के आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकांना कर्ज मिळणारा हा दर आहे. म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून खूप स्वस्त कर्ज मिळत आहे, म्हणूनच ते त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत.