मुस्लिम धर्मियांसाठी अतिशय पवित्र आहे हज यात्रा; जाणून घ्या याचे महत्व आणि यात्रेदरम्यान केले जाणारे विधी
Muslim pilgrims are seen around the Kaaba at the Grand Mosque in Mecca, Saudi Arabia | File Pic | Photo Credit: IANS

मुस्लीम लोकांसाठी मक्का आणि मदिना (Mecca Madina) या दोन तीर्थस्थळांचे फार मोठे महत्व आहे. या ठिकाणी होणारी हजची (Hajj) यात्रा ही फार पवित्र मानली आहे. जगभरातील मुस्लीम आपल्या आयुष्यात एकदा तरी हज यात्रेचे पुण्य पदरी पाडण्याचे प्रयत्न करतात. मुस्लीम लोकांचे पवित्र शहर ‘मक्का’ इथे ही यात्रा 5 दिवस चालते. शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या हजची यात्रा करण्यास  सक्षम असलेल्या व्यक्तीस इस्ति'ताह म्हणतात, तर जो मुस्लीम ही यात्रा पूर्ण करतो त्याला मुस्ताती म्हणतात. ही तीर्थयात्रा इस्लामिक कॅलेंडरचा 12 वा आणि शेवटचा महिना धू अल हिज्जाह च्या 8 ते 12 तारखेपर्यंत भरते.

मक्का शहराच्या पवित्र मशिदमध्ये नमाज वाचणे म्हणजे 1 लाख वेळा नमाज वाचण्याएवढे पुण्य कमावून देते. मुस्लिम आस्थाचे संस्थापक पैगंबर मोहम्मद (Mohammad Paigambar) यांचा जन्म याच शहरात 570 मध्ये झाला होता. पुढे घडलेल्या मतभेदामुळे पैगंबर मदिनेला निघून गेले. इथेच त्यांनी देह ठेवला व त्यांची कबरही इथेच बांधण्यात आली. सौदी अरेबियाच्या मक्कामध्ये इस्लामची सर्वात पवित्र काबा मशिद देखील आहे. ही मशिद मुस्लिम परंपरेनुसार काळ्या दगडांनी पहिल्यांदा अदमद्वारे मग त्यानंतर अब्राहम आणि त्यानंतर त्यांचे पुत्र इशमेलद्वारे बांधली गेली होती.

कलमा वाचणे, नमाज पठन, रोजा ठेवणे, जकात देणे आणि हजला जाणे ही मुस्लीम धर्माची पाच महत्वाची अंगे आहेत. म्हणूनच हज यात्रेचे विशेष महत्व आहे. 628 मध्ये पैगंबर मोहम्मद यांनी आपल्या 1,400 अनुयायींना एकत्र आणत एक यात्रा सुरू केली. ही इस्लामची पहिली हज तीर्थयात्रा म्हणून ओळखली जाते.

हज यात्रेदरम्यान केल्या जाणाऱ्या गोष्टी –

अहराम बांधणे – यात्रेच्या आधी प्रत्येक यात्रेकरूला एक विशिष्ट पोशाख परिधान करावा लागतो. त्यानंतर संपूर्ण यात्रेत अनेक गोष्टी वर्ज्य केल्या जातात.

काबा – त्यानंतर काबा मशिदीला भेट दिली जाते. इथे नमाज पठाण करून सर्वांनी एकत्र पार्थना केली जाते.

सफा आणि मरवा – हे दोन फार महत्वाचे पहाड आहेत. इथेच आपला मुलगा इस्माईलसाठी इब्राहीमची पत्नी पाण्याच्या शोधात गेली होती. या पहाडांच्या मध्ये सात चकरा माराव्या लागतात.

अराफत – त्यानंतर यात्रेकरू अराफतच्या मैदानात पोहोचतात. या मैदानात उभे राहून ते अल्लाहचे स्मरण करतात. तसेच आपल्याकडून घडलेल्या पापांची माफी मागतात.

सैतानाला दगड मारणे – मीना तीन स्थभांवर, सैतानाला हाजी सात दगड मारतात. अरबीमध्ये ह्याला रमीजमारात म्हणतात.

कुर्बानी - सैतानाला दगड मारल्यानंतर एक बकरी किंवा मेंढीचा बळी दिला जातो. बरेचदा उंटाचाही बळी देतात. (हेही वाचा: खुशखबर! ईद निमित्त मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ)

मुंडण - त्यानंतर लोक आपले सगळे केस कापतात तर महिला थोडेसे केस कापतात.

तवाफ – त्यानंतर मक्केला परतून काबा या पवित्र जागेला सात फेऱ्या मारल्या जातात.

ही यात्रा संपल्यावर यात्रेकरू पुढे मदिना येथे जातात. तिथे मोहम्मद पैगंबर यांनी उभारलेल्या मस्जिद-ए-नबवीमध्ये नमाज पढतात. दरम्यान यावर्षी पवित्र हज यात्रेला देशभरातून, 21 शहरांतील 2 लाख भाविक जाणार आहेत. 500 विमानांचे उड्डाण भारतातून होणार असून, पहिल्या टप्प्यातील पहिल्या विमानाचे 4 जुलैला उड्डाण होईल. सध्या या यात्रेकरूंना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया चालू आहे.