देशभरात आज ईदचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जात आहे. मुस्लिम लोकांसाठी अतिशय महत्वाच्या या सणानिमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नुकत्याच सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Government) या ईदच्या सणाचे फार मोठे गिफ्ट मुस्लिम बांधवांना दिले आहे. प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा (Pradhan Mantri Scholarship Yojana) लाभ 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळवून देणार असल्याची घोषणा केंद्राने केली आहे. याबाबत केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी एक बैठक घेतली होती, त्यानंतर या गोष्टीची घोषणा करण्यात आली.
याबाबत बोलताना नक्वी म्हणाले, ‘शिक्षण, रोजगार आणि सशक्तीकरण हे आमचे ध्येय आहे, आणि ते गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पढो-बढो हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबत आता 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.’ हा लाभ मिळण्याची प्रक्रियाही अतिशय सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. (हेही वाचा: मोदी सरकारचा मोठा निर्णय; सर्व शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 6 हजार, पेन्शन योजनाही लागू)
शिष्यावृत्ती योजनेसह मुस्लिम बांधवांच्या रोजगाराबाबतही विचार करण्यात आला आहे. याअंतर्गत शिल्पकार, कारागिरांना रोजगार मिळवून देणे, आपली स्वदेशी उत्पादने ऑनलाईन कशी विकावी याचे प्रशिक्षण देणे अशा गोष्टी राबवल्या जाणार आहेत. पाच वर्षांत 25 लाख तरुणांना रोजगारपूरक कौशल्य प्रधान करण्यात येणार आहे.