PM Narendra Modi with Union Home Minister Amit Shah. (Photo Credits: PTI)

मंत्रिमंडळात खाते वाटप झाल्यानंतर आज कॅबिनेटची महत्वाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. यामध्ये मोदी सरकारकडून दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमार्फत (PM-KISAN Scheme) वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या पेन्शनचाही निर्णय घेण्यात आला आहे. आधी ज्यांच्याकडे दोन हेक्टर म्हणजे पाच एकर शेती आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता. मात्र आता मोदी सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू केली आहे. या निर्णयाद्वारे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे फार मोठे पाऊल उचलले आहे.

कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात भाजप सरकारने याबाबतचे आश्वासन दिले होते. आजच्या पहिल्याच बैठकीत हे आश्वासन पूर्ण करण्यात आले आहे. या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे देशातील जवळपास 14.5 कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. (हेही वाचा: शहीद जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपमध्ये वाढ, मोदी सरकारने घेतला पहिला महत्वाचा निर्णय)

या बैठकीत शेतकरी आणि लघू उद्योजकांसाठी पेन्शन योजनाही घोषित केली. या योजनेअंतर्गत, आता सरकारकडून 18 ते 40 वर्ष वयाच्या शेतकरी आणि लघू उद्योजकांना वयाच्या 60 व्या वर्षी दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळेल. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना महिन्याला फक्त 55 रुपये भरायचे आहेत.