शहीद जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपमध्ये वाढ, मोदी सरकारने घेतला पहिला महत्वाचा निर्णय
नरेंद्र मोदी (Photo Credits: PTI/File)

गुरुवारी (30 मे) दिल्लीत राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेतली. त्यानंतर आज (31 मे) लगेच दुसऱ्या दिवशी मोदी सरकारकडून कामाबद्दलच्या हालचाली सुरु झाल्या असून नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्र दलामधील शहीद जवानांच्या मुलांसाठी सुरु करण्यात आलेल्या स्कॉलरशिप योजनेचा विस्तार केला आहे.

राष्ट्रीय संरक्षण निधीअंतर्गत पंतप्रधान स्कॉलरशिप योजनेत आता बदल करण्यात आला आहे. याबद्दल नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत अधिक माहिती दिली आहे. तर नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुलांचा या स्कॉलरशिप मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत मुलांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप रक्कमेतसुद्धा वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.(Modi Cabinet Swearing in Ceremony Live News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान)

यापूर्वी स्कॉलरशिपअंतर्गत मुलांसाठी दोन हजार रुपये मिळत होते. तर आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असूनत ती अडीच हजार रुपये करण्यात आली आहे. तसेच मुलींसाठी यापूर्वी 2250 रुपये देण्यात येत होते. मात्र त्यामध्ये वाढ करत तीन हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.