8th Pay Commission: सातवा वेतन आयोग लागू होऊन 8 वर्षे झाली आहेत. या काळात महागाईत दोन ते तीन पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून 8 वा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची (Government Employees) ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी मिळते, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 रुपये आहे. यापूर्वी सहावी वेतनश्रेणी होती आणि त्यात कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सात हजार रुपये होते. अशा स्थितीत जेव्हा आठवी वेतनश्रेणी लागू होईल तेव्हा कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.
केंद्र सरकार या अर्थसंकल्पात 8वी वेतनश्रेणी जाहीर करू शकते. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 186 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही लक्षणीय वाढ होणार आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी म्हटले आहे की त्यांना किमान 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरची अपेक्षा आहे. हे 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत 2.57 च्या फिटमेंट घटकापेक्षा 29 बेस पॉइंट्स (bps) जास्त आहे. (हेही वाचा - 8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच आठवा वेतन आयोग लागू होणार?, पेन्शनधारकांनाही मिळणार फायदा)
सरकारने 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरला मान्यता दिल्यास, सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार 186 टक्क्यांनी वाढून 51,480 रुपये होईल, तर सध्याचा पगार 18,000 रुपये आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये आणखी कोणतीही वाढ केल्यास पगारामध्ये वाढ होईल. फिटमेंट फॅक्टर वाढल्याने कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि पगार दोन्ही वाढते. (हेही वाचा -State Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ‘मोठी’ वाढ, सहा महिन्यांची थकबाकीही मिळणार)
दरम्यान, 8 व्या वेतन आयोगांतर्गत, पेन्शनमध्ये देखील 186 टक्के वाढ अपेक्षित आहे, जी सध्याच्या 9,000 रुपयांवरून 25,740 रुपयांपर्यंत वाढेल. सध्या आवश्यक असलेला फिटमेंट फॅक्टर 2.86 लागू केला तरच ही गणना बरोबर होईल. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील अर्थसंकल्प 2025-26 मध्ये त्याची घोषणा केली जाऊ शकते.