8th Pay Commission: केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर होण्यासाठी फक्त 4 दिवस उरले आहेत. अर्थसंकल्पाकडून सर्वच क्षेत्रातील लोकांना खूप अपेक्षा आहेत. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांनाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. 8 वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करताना 8 वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
सध्या देशात सातवा वेतन आयोग सुरू आहे. सरकारने 8वा वेतन आयोग जाहीर केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. तसे झाल्यास खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंतच्या सरकारी अधिकाऱ्यांचे पगार वाढतील. (हेही वाचा -PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता - रिपोर्ट)
दर 10 वर्षांनी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला जातो. आतापर्यंत 5व्या, 6व्या आणि 7व्या वेतन आयोगामध्ये 10 वर्षांचा कालावधी होता. 2023 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केला जाईल आणि त्याच्या शिफारशी 2026 मध्ये लागू केल्या जातील असा अंदाज कर्मचाऱ्यांनी पूर्वी व्यक्त केला होता.
विशेष म्हणजे, यावेळी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत असेल. सुमारे महिनाभराच्या विश्रांतीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 12 मार्चपासून सुरू होणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.