ATM Cash Withdrawal Charges: 'एटीएम'मधून पैसे काढणे होणार महाग, डेबिट/क्रेडिट कार्डच्या शुल्कात वाढ; जाणून घ्या काय असतील नवीन चार्जेस
ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

जर का आपण एटीएम कार्ड (ATM Card) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता एटीएममधून पैसे काढणे आणि डेबिट/क्रेडिट कार्डच्या शुल्कात वाढ होणार आहे. ग्राहकांनी एटीएममधून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर, बँका त्यांचे शुल्क वाढवू शकतात. बँकांकडून एटीएमवरील शुल्क वाढीसाठी प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपयांच्या प्रस्तावाला आरबीआयने नुकतीच मान्यता दिली आहे. हे नवीन दर 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. ग्राहक बँकेच्या एटीएमद्वारे दरमहा पाच मोफत व्यवहार करू शकतात.

यात आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. यापेक्षा जास्त व्यवहार झाले तर, ग्राहकांना शुल्क भरावे लागते. यासाठी आता प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल. बँकांचे एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांकडून रोख रक्कम काढण्यासाठी मेट्रो शहरांमध्ये तीन आणि इतर शहरांमध्ये पाच विनामूल्य एटीएम व्यवहारांची सवलत आहे.

आरबीआयने एटीएम व्यवहाराची इंटरचेंज फी प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 15 रुपयांवरून 17 रुपयांपर्यंत वाढविली आहे आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरून 6 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन दर 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होतील. आरबीआयच्या मते, इंटरचेंज फी ही क्रेडिट कार्डे किंवा डेबिट कार्ड्सद्वारे पेमेंटवर प्रक्रिया करणाऱ्या मर्चंट्सकडून आकारली जाणारी फी आहे.

(हेही वाचा: Aadhaar-Ration Card Linking: रेशन कार्ड आधार कार्ड जोडणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत; 92% जोडणी प्रक्रिया पूर्ण)

स्टेट बँक ऑफ इंडियाने जुलैच्या सुरूवातीस एटीएम आणि बँक शाखेतून पैसे काढण्यासाठी सेवा शुल्कामध्ये बदल केला आहे. त्याअंतर्गत अनेक शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. एसबीआयच्या म्हणण्यानुसार बीएसबीडी खातेधारक आता कोणत्याही सेवा शुल्काशिवाय केवळ चार वेळा शाखा आणि एटीएममधून पैसे काढू शकतील. जर ग्राहक एटीएम किंवा शाखेतून यापेक्षा जास्त पैसे काढत असतील, तर प्रत्येक व्यवहारासाठी त्यांना सेवा शुल्क व जीएसटी म्हणून 15 रुपये द्यावे लागतील. एसबीआयशिवाय अन्य कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी हाच नियम लागू असेल.