Aadhar Authentication Big Update: केंद्र सरकारने दिली जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरणास परवानगी; जाणून घ्या सविस्तर
आधार कार्ड (Photo Credits: File Photo)

आधार कार्ड (Aadhaar Card) ही भारतीय नागरिकांची ओळख आहे, जे भारत सरकारने लोकांना प्रदान केलेले वैध ओळखपत्र आहे. आता केंद्र सरकारने भारताच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाला जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरण वापरण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) एक राजपत्र अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाला अशा नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ते ऐच्छिक असेल.

या वर्षी एप्रिलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी खाजगी कंपन्यांद्वारे आधार प्रमाणीकरण सक्षम करण्यासाठी विद्यमान नियमांमध्ये बदल प्रस्तावित केले होते. आता 27 जून रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कार्यालयांना जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या ओळख तपशीलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आधार डेटाबेस वापरण्याची परवानगी दिली आहे.

जन्म आणि मृत्यूची नोंदणी अधिनियम 1969 अंतर्गत नमूद केले आहे की, नियुक्त केलेल्या रजिस्ट्रारला जन्म किंवा मृत्यूच्या अहवालात मागितलेल्या इतर तपशीलांसह गोळा केल्या जात असलेल्या आधार क्रमांकाच्या पडताळणीसाठी स्वेच्छेने 'होय' किंवा 'नाही' निवडण्याची परवानगी दिली जाईल. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन आधार प्रमाणीकरणाच्या वापराबाबत मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतील. (हेही वाचा: GST Scam: ईलेक्ट्रॉनिक वे बिल तयार करत 15,000 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा, युपीतून पोलीसांनी १५ जणांना घेतले ताब्यात)

दरम्यान, आत्तापर्यंत देशात 1,373,539,199 आधार क्रमांकांची नोंदणी करण्यात आली आहे आणि 777,673,372 आधार क्रमांक अपडेट करण्यात आले आहेत. यूआयडीएआय (UIDAI) वेबसाइटनुसार, 94,931,352,722 आधार प्रमाणीकरण केले गेले आहेत आणि 15,509,179,314 ई-केवायसी आधारद्वारे केले गेले आहेत.