भारतीय अर्थव्यवस्था | प्रतीकात्मक फोटो (संग्रहित संपादित प्रतिमा)

 

रेटिंग एजन्सी फिचने (Fitch) अंदाज वर्तवला आहे की, या आर्थिक वर्षात म्हणजेच 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) 10.5 टक्क्यांनी घसरेल. म्हणजे जीडीपी ग्रोथ (GDP Growth) वजा 10.5 टक्के असू शकते. महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामुळे याआधी देशातील जून तिमाहीतील जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांनी घट झाली आहे. भारताच्या आधुनिक इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण होती. मार्चमध्ये लागू करण्यात आलेल्या कठोर लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्थेतील ही घसरण दिसून आली. फिचने सांगितले आहे की, ‘अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असताना, ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिसर्‍या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी सुधारणा अपेक्षित आहे. परंतु सुधारणेची गती मंद आणि असमान असल्याचे दिसत आहे.’

फिचने सांगितले की, ‘आम्ही चालू आर्थिक वर्षातील जीडीपी अंदाज जूनच्या ग्लोबल इकॉनॉमी आऊटलुकच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी केला आहे.’ कोरोना संकटामुळे एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात ऐतिहासिक 23.9 टक्के घट झाली. म्हणजेच जीडीपीमध्ये जवळपास एक चतुर्थांश घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत स्थिर किमतींवर म्हणजेच,  रिअल जीडीपी 26.90 लाख कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच काळात 35.35 लाख कोटी रुपये होता. अशा प्रकारे तो 23.9 टक्क्यांनी घसरला आहे. मागील वर्षी या काळात जीडीपीमध्ये 5.2 टक्के वाढ झाली होती. (हेही वाचा: स्टेट बँक मध्ये यावर्षी 14,000 जागांसाठी भरती निघणार , बँकेने दिली 'ही' महत्त्वाची माहिती)

मात्र, रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे की भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 9.9 टक्क्यांनी वाढ नोंदवेल. यामागील मुख्य कारण म्हणजे मागील आर्थिक वर्षाचा कमकुवत बेस इफेक्ट. या अहवालात असे म्हटले आहे की देशाची अर्थव्यवस्था ढासळण्याची ही सहावी वेळ आहे. यापूर्वी 1957–58, 1965-66, 1966-67, 1972–73 आणि 1979-80 या आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था घसरली होती. याआधी 1979-80 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठी घसरण नोंदली गेली. त्यावेळी अर्थव्यवस्था 5.2 टक्क्यांनी खाली आली होती.