Agni-5 missile (Photo Credit - File Image)

भारताने अग्नी-5 या जमिनीपासून पृष्ठभागावर मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यशस्वीरित्या प्रक्षेपित केले असून ते 5,000 किमीपर्यंतच्या अंतरावरील लक्ष्यांना अत्यंत अचूकतेने मारा करू शकणार आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे प्रक्षेपण करण्यात आले.  तीन-स्टेज सॉलिड-इंधन इंजिन वापरणारे हे क्षेपणास्त्र 5,000 किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य अत्यंत अचूकतेसह मारा करण्यास सक्षम आहे, असे मंत्रालयाने सांगितले आहे. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की अग्नी-5 ची यशस्वी चाचणी भारताच्या 'विश्वासार्ह किमान प्रतिबंध' या धोरणाशी सुसंगत आहे जी 'प्रथम वापर नाही' या वचनबद्धतेला अधोरेखित करते. (हे ही वाचा भारताचा इस्त्रायलसोबत क्षेपणास्त्र करार.)

अग्नी ५ हे जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणारे एक आंतरखंडीय अण्वस्त्रवाहक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या आधी सात यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. यावेळी पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी चाचणी घेण्यात आली आणि ही चाचणी यशस्वी झाली.

भारताने रात्रीच्या वेळी केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीत एमआयआरव्ही (Multiple Independently Targetable Reentry Vehicle - MIRV) तंत्रज्ञानाचा वापर केला होता की नाही हे अद्याप समजलेले नाही. या तंत्राच्या मदतीने एकाच क्षेपणास्त्राद्वारे किमान दोन आणि कमाल दहा ठिकाणी स्फोटके टाकून हल्ला करणे शक्य आहे. जर हे तंत्र पण वापरले असेल तर कोणत्याही वेळी हल्ला करुन शत्रूची मोठी हानी करण्याची क्षमता भारताच्या हाती आली असे म्हणणे योग्य ठरेल.

भारताच्या भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या एकत्रिकरणातून एक 'स्ट्रॅटेजिक फोर्स' तयार करण्यात आला आहे. या 'स्ट्रॅटेजिक फोर्स'कडे भारताच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा विभाग सोपवण्यात आला आहे.