भारताचा इस्त्रायलसोबत क्षेपणास्त्र करार
(संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता भारताने रशियासोबत S-400चा करार केला. त्यानंतर अमेरिकेची चडफड अद्यापही कायम असताना भारताने पुन्हा एकदा अमेरिकेला धक्का दिला आहे. भारताने इस्त्रायलच्या सरकारी एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI)सोबत ७७७ मिलियन डॉलरचा नाव करार केला आहे. या करारानुसार इस्त्रायली कंपनी भारतीय नौसेनेला ७ जहाजांसाठी LRSAM एअर आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पूरवणार आहे. इस्त्रायली कंपनीने बुधवारी ही माहिती दिली.

IAIसांगितले की, मुख्य कंत्राटदार असलेली भारताची सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)सोबत हा करार झाला. दरम्यान, LRSAM (बराक ८ चा एक भाग) ही एक हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे. ज्याचा वापर इस्त्रायली नौसेनेसोबत भारतीय नौसेना करते. ही प्रणाली हवाईदल आणि भूदल अशी दोन्ही प्रकारी लष्करी दले याचा वापर करु शकतात. IAIने सांगितले की, या करारासोबत बराक ८ची विक्री गेल्या काही वर्षांत ६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. (हेही वाचा, एक राऊंड 36 वार: भारत-रशिया S-400 खरेदी करार: काय आहेत वैशिष्ट्ये?)

IAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमरद शेफर यांनी सांगितले की, 'भारतासोबतची आमची भागिदारी अनेक वर्षांपासूनची जुनीच आहे. आता आम्हाला संयुक्तरित्या प्रणाली आणि विकास याच्या उत्पादनवाढीसाठी काम करायचे आहे'. पुढे त्यांनी असेही सांगितले की, IAI साठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. वाढत्या स्पर्धेचा विचार करता भारत आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी योग्य दिशेने पाऊल टाकत आहे.