प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! असं म्हटलं जातं आणि ते तितकेच खरे देखील आहे. भारतामध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात. यंदादेखील कोरोना संकटाच्या सावटाखाली महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षांचं (MPSC Exam) आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात एमपीएससीची परीक्षा 3 टप्प्यांत घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचे मार्क्स एकत्र करून अंतिम निकाल लावला जातो. आता नव्या वेळापत्रकानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Prelims Exam) यंदा 11 ऑक्टोबर 2020 दिवशी होणार आहे. त्या परीक्षेसाठी सज्ज होत असाल तर जाणून घ्या या प्रशासकीय सेवेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी?
-
परीक्षेचं स्वरूप जाणून घ्या
एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये 200 गुणांचे प्रत्येकी दोन पेपर असतात. त्यामध्ये निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम आहे. तर मुख्य परीक्षा 800 मार्कांची असते. यामध्ये ऑब्जेक्टीव्ह /बहुपर्यायी प्रश्न सोबतच सविस्तर उत्तरं लिहणं देखील समाविष्ट आहे.
-
नियमित अभ्यास
स्पर्धा परीक्षांमध्ये लाखो उमेदवार मेहनत घेत असतात. त्यामुळे तुम्ही खरंच गांभीर्यपूर्वक या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुम्हांला नियमित आणि सातत्याने अभ्यास करणं आवश्यक आहे. दिवसभरातील विशिष्ट वेळ एमपीएससीच्या परीक्षांसाठी काढून ठेवा.
-
नोट्स काढा
घोकंपट्टी करण्याची सवय टाळा आणि प्रत्येक विषयाच्या सुरूवातीपासूनच नोट्स काढायला शिका. शेवटच्या टप्प्यावर अभ्यास करताना यामुळे तुमची धांदल उडणार नाही. तसेच नोट्स स्वतः काढायची सवय असल्यास अधिक लक्षात राहू शकतं.
-
जुन्या प्रश्नपत्रिका चाळा
परीक्षेचं स्वरूप जाणून अभ्यास केल्यास तुम्हांला तो अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. त्यामुळे सिलॅबस पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका चाळा, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमची तयारी किती आहे? तुम्ही कुठे कमी पडता याचा वेळीच अंदाज येईल.
-
ताण तणाव दूर ठेवा
परीक्षेची भीती बाळगून किंवा न्यूनगंडातून परीक्षेची तयारी करू नका. आत्मविश्वासू आणि सकारात्मक रहा. ताणतणाव दूर ठेवा. नियमित सकस आहार आणि पुरेशी झोप घ्या. दडपणाखाली राहिल्यास तुम्ही अपेक्षित ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही.
-
शेवटच्या मिनिटापर्यंत तयारी ठेवू नका
शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करण्याची सवय ठेवू नका, तसेच अभ्यासक्रमातील कोणताच भाग सरसकट ऑप्शनला टाकू नका.
MPSC ही स्पर्धा परीक्षा असल्याने कठीण असली तरीही अशक्य नाही. तुम्ही त्याला सामोरं जातानाच त्याच्या फायद्या-तोट्यांची मानसिक तयारी करून ठेवा. तुमचा प्लॅब बी देखील तयार ठेवा. वयानुसार, आरक्षणानुसार तुम्हांला कधी पर्यंत किती अटेम्प्ट देता येऊ शकतात याची आधीच मानसिक तयारी करा आणि त्यानुसार आयुष्यातील इतर गोष्टींचं आयोजन करा.