Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागास 100 % रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यास अनुसुरून आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मे. न्यास कम्युनिकेशन यांची नेमणूक केली आहे. शासनाच्या परवानगी नुसार गट क मधील 52 संवर्गातील 2739 रिक्त पदे भरण्यासाठी 4,05,163 अर्ज प्राप्त झाले. याबाबतची परीक्षा मे. न्यास यांचेमार्फत दि. 24 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. सदरील भरतीमधील 52 संवार्गापैकी 1 संवर्ग राज्य – मुंबई, 23 संवर्ग राज्य – पुणे स्तरावरील असून 28 संवर्ग हे 8 मंडळ स्तरावरील आहेत.

उपरोक्त परीक्षार्थीना प्रवेश पत्र निर्गमित करण्याची कार्यवाही काल दि. 15/10/2021 रोजी संध्याकाळी 6 वाजेपासून सुरु झाली आहे. या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांची सोय व्हावी म्हणून काही निर्णय घेण्यात आले आहेत.

उमेदवार अर्ज भरताना त्यांना कोणत्या पदामध्ये आवड आहे याबाबत निश्चित नसतात. ते कोणत्या पदासाठी व कोणत्या कार्यालयात अर्ज केला म्हणजे निवड होण्याची श्यक्यता जास्त आहे याबाबत अंदाज करत राहतात व त्यामुळे ते अनेक पदांसाठी अर्ज भरतात आणि शेवटपर्यंत कोणत्या पदाची परीक्षा द्यायची हे ठरवत नाहीत. अर्ज करतानाच पर्याय बंद केल्यास उमेदवारांचे नुकसान होईल त्यामुळे आरोग्य विभागाच्या मागील 8 वर्षांपासून घेण्यात येत असलेल्या पद भरतीमध्ये उमेदवार कितीही पदासाठी अर्ज करू शकतात, मात्र ते ज्या पदाच्या परीक्षेसाठी बसतील त्या पदाच्या नेमणुकीसाठी त्यांचा विचार करण्यात येईल अशी पद्धत अवलंबण्यात येते.

उमेदवारांसाठी सर्वच पदांचे पर्याय ओपन ठेवायचे ठेवायचे ठरविल्यास 52 पदांची व 14 कार्यालयांची परीक्षा घेण्यास दिड ते दोन वर्ष कालावधी लागेल. त्यामुळे 52 संवर्गांच्या परीक्षा 2 शिफ्ट मध्ये घेण्याचे ठरले. यातील पहिल्या शिफ्ट मध्ये 10 ते 12 वी शिक्षण आवश्यक असणारे व दुसऱ्या शिफ्ट मध्ये पदवी व त्यावरील शिक्षण आवश्यक असणारे संवर्ग सामाविष्ट केले आहेत.

उमेदवारास परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला असून, उमेदवाराचे पद ज्या नेमणूक अधिकाऱ्याचे अंतर्गत येते त्या विभागात त्यास परीक्षा केंद्र दिले आहे. उदा. उमेदवाराने अकोला विभागातील पदासाठी अर्ज केला असल्यास त्यास अकोला विभागातीलच परीक्षा केंद्र मिळेल. ही अट ठेवली नाही तर पुढारलेल्या भागातील उमेदवार आपल्या गावी बसून राज्यातील कोणत्याही भागासाठी अर्ज करतील आणि निवड झाल्यावर एक तर हजर होणार नाहीत किंवा हजर होऊन काम करणार नाहीत किंवा पहिल्या दिवसापासून बदली मागतील. याचा सर्वात जास्त दुष्परिणाम आदिवासी भागावर होईल.

उमेदवाराने एकाच मंडळात वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केला असल्यास त्यास दुपारच्या शिफ्ट साठी श्यक्यतो पहिल्या शिफ्टचे शहर देण्यात आले आहे. मात्र दोन वेगळ्या मंडळांसाठी अर्ज केला असल्यास त्या त्या मंडळांमध्ये परीक्षा केंद्र दिले आहे.

पुणे, नाशिक आणि अकोला मंडळांमध्ये जास्त उमेदवारांनी अर्ज केले असल्यामुळे या मंडळांमध्ये उमेदवारांना मंडळातील इतर जिल्ह्यांमधील किंवा जवळच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.