सध्या प्राणघातक अशा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग टाळण्यासाठी लस (Vaccine) हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. कोरोना विषाणूपासून बचावासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम चालू आहे. भारतातही प्रामुख्याने कोव्हिशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन लसीचे डोस दिले जात आहेत. आतापर्यंत देशभरातील सुमारे 45 कोटी लोकांना लसीचे डोस दिले आहेत. आता कोव्हिशिल्डबद्दल सरकारने काही खुलासे केले आहेत. मंगळवारी सरकारकडून माहिती देण्यात आली की, कोव्हिशिल्ड ही लस कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी 93 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे, तर यामुळे मृत्यूदरात 98 टक्क्यांपर्यंत घट होत असल्याचे दिसून आले आहे.
सशस्त्र सैन्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Armed Forces Medical College) अभ्यासाचा संदर्भ देताना भारत सरकारने म्हटले आहे की, कोविड-19 च्या दुसर्या लाटे दरम्यानच डेल्टा व्हेरिएंट प्रकार समोर आला होता. पुढे अभ्यासात असे दिसून आले की ज्या लोकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे त्यांना व्हायरसपासून 93 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळाले आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, 15 लाख डॉक्टर आणि फ्रंटलाइन वर्कर्स कामगारांवर केलेल्या अभ्यासानुसार हा निष्कर्ष काढला गेला आहे.
कोविड-19 संसर्गाच्या प्रतिबंधात लसीकरणाची भूमिका स्पष्ट करताना डॉ. पॉल म्हणाले की, लसीकरण व्हायरसची लागण कमी करते मात्र लसीकरण कोणत्याही प्रकारे व्हायरसपासून संरक्षणाची संपूर्ण हमी देत नाही. म्हणूनच, लसीकरणाबरोबरच कोरोना कालावधीमध्ये आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, जगातील कोणतीही लस संसर्ग होणार नाही याची हमी देऊ शकत नाही, परंतु ही लस आपल्याला गंभीर आजारापासून वाचविण्यात उपयुक्त ठरू शकते. त्यांनी आवाहन केले आहे की, कोरोना प्रकरणात घट झाल्यानंतरही सावध राहा आणि काळजी घ्या. (हेही वाचा: पुढच्या महिन्यात येऊ शकते लहान मुलांसाठीची Covid-19 Vaccine; आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांची माहिती)
डॉ व्हीके पॉल म्हणाले की, ईशान्येकडील राज्यांमध्ये कोविड-19 चा सकारात्मक दर 19 टक्क्यांहून अधिक आहे. डॉ. पॉल यांच्या म्हणण्यानुसार, भारतात ऑगस्टमध्ये 15 कोटी डोस उपलब्ध होणार असून त्यानंतर देशात दररोज 50 लाख लोकांना लस दिली जाऊ शकते.