65 वर्षांहून अधिक वयाच्या कलाकारांसाठी चित्रपट, मालिका निर्मात्यांची कोर्टात धाव; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल
Film Video Camera Used For Representational Purpose (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यात लॉक डाऊन (Lockdown) नियमांमध्ये शिथिलता आणत, अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली. यामध्ये चित्रपट, मालिका यांच्या शुटींगलाही (Shooting) सशर्थ परवानगी मिळाली आहे. मात्र आता इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनने (IMPPA) राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांविरोधात, मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार 65 वर्षांवरील व्यक्तींना कोणत्याही शुटींगच्या कामात सहभागी घेण्यास मनाई आहे. याबाबत या आठवड्याच्या सुरुवातीस याचिका दाखल केली गेली आहे. सरकारने लागू केलेली वयाची विशिष्ट अट रद्द करावी, अशी निर्मात्यांची मागणी आहे.

यामध्ये चित्रपट आणि टीव्ही मालिका तसेच शॉर्ट फिल्म आणि इतर कार्यक्रमांची निर्मिती करणारे हजारो सदस्य आहेत. याचिकाकर्त्याकडे उपलब्ध असलेल्या यादीनुसार, लॉक डाऊन लागू होण्यापूर्वी 65 वर्षांवरील वयाचे हजारो लोक शुटिंगमध्ये भाग घेत होते. मात्र आता अशा लोकांना परवानगी नसल्याने, निर्म्त्यांच्या समोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अ‍ॅडव्होकेट अशोक सरोगी यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असेही म्हणण्यात आले आहे की, निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार इत्यादी लोक चित्रपट आणि मालिकांचे शुटींग पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सध्या हा संपूर्ण व्यापार ठप्प झाला आहे आणि या उद्योगाशी संबंधित अनेक लोकांसमोर आर्थिक अडचणी उभा राहिल्या आहेत. त्यातील काहींनी आत्महत्या केल्या आहेत. जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु अशा गोष्टी करण्यासही काही मर्यादा आहेत. त्यात जे 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांच्या आर्थिक अडचणी अजून वाढल्या आहेत.

मंगळवारी या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने राज्याला काही प्रश्न विचारले. 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती जी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे, मात्र तिला बाहेर जाण्याची आणि पैसे कमावण्याची परवानगी नसेल, तर तिने कसे जगावे?

राज्याला अजूनही काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील-

65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही कलाकार/क्रू सदस्यांना स्टुडिओ/शूटिंग साइट्सवर जाण्यापासून प्रतिबंधित केलेली मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यापूर्वी,  कोणताही डेटा/अहवाल/आकडेवारी विचारात घेतली गेली आहे की नाही? (हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद आता देणार रोजगार)

हाच नियम 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्ती ज्या ट्रेन/बसेस/एअरक्राफ्ट इत्यादींनी प्रवास करतात, त्यांना लागू आहे का? तसेच हाच नियम दुकाने किंवा खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या 65 वर्षांपेक्षा जास्त व्यक्तीना लागू आहे की नाही?