Pravasi Rojgar App: लॉकडाउनच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद आता देणार रोजगार
Sonu Sood (PC - Facebook)

कोरोना संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) अनेक गरजुंना मदत केली आहे. आतापर्यंत देशाच्या विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना, मजुरांना त्याने त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. त्याच्या मदतीचा ओघ अजूनही सुरूच असून आता त्याने स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचीही व्यवस्था केली आहे. मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने याबाबत माहिती दिली आहे. यासाठी त्याने प्रवासा रोजगार (Pravasi Rojgar App) या नावाने ऍप लॉन्च केले असून मजुरांना रोजगार शोधण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती व लिंक्स या ऍपवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दरम्यान, सोनू सूद सातत्याने त्याचे मदतकार्य करत आहे. त्यामुळे विविध स्तरांमधून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. आतापर्यंत सोनूने अनेकांना त्यांच्या गावी सुखरुपरित्या पाठविले असून अनेकांच्या जेवणाचीही व्यवस्थादेखील केली आहे. विशेष म्हणजे प्रथम देशात अडकलेल्या नागरिकांना मदत करणाऱ्या सोनूने विदेशात अडकलेल्या भारतीयांसाठीही आता मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानंतर सोनू सूदने आता स्थलांतरित मजुरांना रोजगार देण्याचे ठरवले आहे. बांधकाम, कापड व्यवसाय, आरोग्यसेवा, अभियांत्रिकी, बीपीओ, सुरक्षा, ऑटोमोबाइल, ई-कॉमर्स या विविध क्षेत्रांतील 500 कंपन्यांतील नोकरीच्या संधींची माहिती या अ‍ॅपद्वारे मिळेल. हे देखील वाचा- सोनू सूद याने पोलिस कर्मचा-यांना दिल्या 25,000 फेस शिल्ड; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून मानले आभार

सोनू सूद याचे ट्वीट-

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद म्हणाला की, या अ‍ॅपसाठी गेल्या काही महिन्यांपासून फार विचार, प्लॅनिंग व तयारी केली आहे. दारिद्र्यरेषेखालील तरुणवर्ग, स्वयंसेवी संस्था, सल्लागार, स्टार्टअपचे तंत्रज्ञ, तळागाळावर काम करणाऱ्या संस्था आणि घरी परतण्यास मी मदत केलेल्या मजुरांशी सल्लामसलत केली आहे, असे सोनू सूद म्हणाला आहे.