TV | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

केबल टीव्हीवर (Cable TV) मनोरंजनाच्या वाहिन्यांचा आनंद लुटणाऱ्या प्रेक्षकांना नव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डिस्ने-स्टार, सोनी आणि झी सारख्या मोठ्या ब्रॉडकास्टर्सने केबल टीव्ही पुरवणाऱ्या प्लॅटफॉर्मवरील चॅनेलच्या किमती वाढवण्याची अट ठेवली होती. मात्र ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशनने (AIDCF) त्यास नकार दिला होता. एआयडीसीएफच्या नेतृत्वाखाली केबल टीव्ही ऑपरेटर या दरवाढीविरोधात आवाज उठवत होते परंतु ब्रॉडकास्टर्सनी त्यांचे ऐकले नाही.

आता ब्रॉडकास्टर्सनी केबल टीव्हीवरील आपल्या वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबवले आहे. यामुळे देशभरातील सुमारे साडेचार कोटी कुटुंबे केबल टीव्हीवर अनेक लोकप्रिय मनोरंजन वाहिन्या पाहण्यापासून वंचित असल्याचे सांगण्यात येत आहे.

यावरून एआयडीसीएफने ब्रॉडकास्टर्स आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ब्रॉडकास्टर्सची हुकूमशाही आणि ट्रायच्या उदासीन वृत्तीमुळे साडेचार कोटी घरे केबल टीव्ही मनोरंजनापासून वंचित असल्याचे एआयडीसीएफने म्हटले आहे. एआयडीसीएफकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे,- ‘डिस्ने-स्टार, सोनी आणि झी यांनी केबल टीव्ही प्लॅटफॉर्मसाठी त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत.’ यामध्ये पुढे म्हटले आहे की, केबल टीव्ही प्लॅटफॉर्मने ब्रॉडकास्टर्सच्या अयोग्य किंमतीवर आक्षेप घेतला आहे.

ब्रॉडकास्टर्सनी केबल ऑपरेटरना नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO 3.0) साठी रेफरन्स इंटरकनेक्ट ऑफर (RIO) वर स्वाक्षरी करण्यासाठी नोटिस पाठवल्या होत्या. नवीन टॅरिफ ऑर्डरच्या अंमलबजावणीशी संबंधित एक प्रकरण केरळ उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, ज्यावर निर्णय होणे बाकी आहे. अशा परिस्थितीत एआयडीसीएफशी संबंधित केबल ऑपरेटर्सनी वाहिन्यांच्या किमती वाढवण्यास विरोध केला होता.

एआयडीसीएफचे सरचिटणीस मनोज छंगानी यांनी सांगितले की, केबल टीव्ही प्लॅटफॉर्मला केवळ 48 तासांची नोटीस देण्यात आली होती. हे प्रकरण अनेक न्यायालयांमध्ये न्यायप्रविष्ट आहे. काही केबल प्लॅटफॉर्मने ब्रॉडकास्टर्सना अशा कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे चॅनेल डिस्कनेक्ट न करण्याचे आवाहन केले होते. मात्र तरी डिस्ने स्टार, सोनी आणि झी ब्रॉडकास्टर्सनी केबल टीव्ही प्लॅटफॉर्मवरील त्यांचे चॅनेल डिस्कनेक्ट केले आहेत. (हेही वाचा: NEFT/ RTGS New Rule: RBI ने बदलले NEFT आणि RTGS चे नियम; जाणून घ्या काय होणार याचा परिणाम)

दरम्यान, ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन (AIDCF) ही डिजिटल मल्टी सिस्टम ऑपरेटर्स (MSOs) साठी भारताची सर्वोच्च संस्था आहे. फेडरेशन भारतीय डिजिटल केबल टीव्ही उद्योगासाठी अधिकृत आवाज म्हणून काम करते. यासाठी ते मंत्रालये, धोरण निर्माते, नियामक, वित्तीय संस्था आणि तांत्रिक संस्थांशी संवाद साधते आणि केबल ऑपरेटरना व्यासपीठ उपलब्ध करून देते.