क्रिकेटर MS Dhoni करणार चित्रपट क्षेत्रात एन्ट्री; दाक्षिणात्य अभिनेत्री Nayanthara शी हातमिळवणी केल्याची चर्चा
Mahendra Singh Dhoni |(Photo Credits: Facebook)

भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) केवळ उत्तरेतच नाही तर दक्षिणेतही चांगली फॅन फॉलोइंग आहे. 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची बोली जिंकण्यासोबतच त्याने दक्षिणेतील चाहत्यांची मनेही जिंकली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीचे तामिळनाडूमध्ये भरपूर चाहते आहेत आणि याठिकाणी त्याला थाला म्हणतात. आता धोनी तामिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अहवालांनुसार धोनीने आपल्या पहिल्या चित्रपटासाठी अभिनेत्री नयनतारासोबत (Nayanthara) हातमिळवणी केली आहे.

या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. परंतु धोनी या चित्रपटामध्ये अभिनय करणार नसून तो या चित्रपटाची निर्मिती करत आहे. धोनी एक निर्माता म्हणून चित्रपट सृष्टीमध्ये एन्ट्री करत आहे. यामध्ये संजयही त्याच्यासोबत असणार आहे. संजय रजनीकांतचा जवळचा असल्याचे सांगितले जाते. आयपीएलच्या चालू हंगामानंतर या प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली जाईल, असे सांगितले जात आहे. यानंतर लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे.

धोनीच्या बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुख्य भूमिका साकारली होती. त्याने आपल्या अभिनयाने आणि साधेपणाने धोनीचे आयुष्य पडद्यावर उत्तमरित्या दाखवले होते. याशिवाय अलीकडेच माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही तामिळ चित्रपट 'डिक्किलूना'मध्ये कॅमिओ केला होता आणि 'फ्रेंडशिप' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याचवेळी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण विक्रमच्या कोब्रा या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून चित्रपटांमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे. यामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (हेही वाचा: 'महाभारत आणि वेदांवरून प्रेरणा घेऊन बनवला 'Avengers'; हनुमानाची कॉपी आहे Thor आणि कर्णावरून घेतला आयर्न मॅन'- Kangana Ranaut)

त्याचबरोबर अभिनेत्री नयनताराही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, तिने शाहरुख खानसोबत हा चित्रपट साईन केल्याचे वृत्त आहे, मात्र त्याचे टायटल अद्याप समोर आलेले नाही. ऍटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. यापूर्वी नयनताराने साऊथमध्ये खूप काम केले आहे. तिने रजनीकांतसोबत दरबारसारखा हिट चित्रपट दिला आहे.