Kangana Ranaut | (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'धाकड' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता नुकतेच कंगनाने असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. कंगना म्हणते की, अव्हेंजर्स फ्रँचायझी (Avengers) भारतीय पौराणिक महाकाव्य 'महाभारत' आणि हिंदू धार्मिक ग्रंथ 'वेद' वरून प्रेरित आहे. एवढेच नाही तर थोरच्या हातोड्याची प्रेरणाही हनुमानाच्या गदापासून घेतली असल्याचे तिने सांगितले. जेव्हा कंगना राणौतला विचारण्यात आले की, सुपरहिरोची भूमिका साकारण्यासाठी ती भारतीय पौराणिक अप्रोच किंवा हॉलीवूड शैली यापैकी कोणती निवड करेल? यावर तिने उत्तर दिले की, ‘मी निश्चितपणे भारतीय पौराणिक अप्रोच स्वीकारेन.’

ती पुढे म्हणाली, ‘मला वाटते की पश्चिम आपल्या पौराणिक कथांमधून खूप काही घेत आहे. जेव्हा मी आयर्न मॅन सारख्या सुपरहिरोकडे पाहते तेव्हा मला वाटते की त्याचे कवच हे महाभारतामधील कर्णाच्या कवचासारखे आहे.’ कंगना रणौत म्हणाली, ’हातोडा चालवणाऱ्या थोराची तुलना हनुमानजी आणि त्यांच्या गदाशी देखील केली जाऊ शकते. मला वाटते की अ‍ॅव्हेंजर्स महाभारतापासून प्रेरित आहे. त्यांचा दृश्य दृष्टीकोन वेगळा आहे, परंतु या सुपरहिरोच्या कथांचा उगम आपल्या वेदांतून आहे.’

(हेही वाचा: यंदाच्या कान्स महोत्सवात अनुराग ठाकूर यांच्या सोबत आर.माधवन, ए.आर.रहमान, अक्षय कुमारसह अनेक सेलेब्ज लावणार उपस्थिती)

कंगना राणौतने ETimes ला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. कंगना सध्या 20 मे रोजी रिलीज होणाऱ्या 'धाकड' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटात तिने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात कंगना रणौत एजंट अग्निच्या भूमिकेत दिसणार आहे. रजनीश घई दिग्दर्शित या चित्रपटात कंगनाशिवाय अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 20 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कंगना लवकरच 'मणिकर्णिका रिटर्न्स', 'तेजस' आणि 'द इनकारनेशन: सीता'मध्ये दिसणार आहे.