आफ्रिकन देश झिम्बाब्वेमध्ये चार दशकांतील सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. या ठिकाणी लोकांना खायला अन्नही नाही, ज्यामुळे सरकार चिंतेत आहे. आता झिम्बाब्वेमध्ये उपासमारीचा सामना करण्यासाठी सरकारने हत्तींना मारण्याचे आदेश दिले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, झिम्बाब्वेच्या 4 जिल्ह्यांमध्ये 200 हत्ती मारले जातील आणि त्यांचे मांस विविध समुदायांमध्ये वाटले जाईल. झिम्बाब्वे पार्क आणि वन्यजीव प्राधिकरणाने याची पुष्टी केली आहे.
झिम्बाब्वेमध्ये जनता मोठ्या दुष्काळाच्या समस्येला तोंड देत आहे. एल निनोमुळे पडलेल्या दुष्काळामुळे देशातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत झिम्बाब्वेतील 6 कोटी 80 लाखांहून अधिक लोक अन्नटंचाईने त्रस्त आहेत. त्यामुळे आता 200 हत्तींना ठार मारून, त्यांचे मांस मानवांना दिले जाईल.
उद्यान आणि वन्यजीव प्राधिकरणाचे प्रवक्ते फारावो म्हणाले की, हत्तींच्या हत्येमागील दुसरा हेतू झिम्बाब्वेच्या उद्यानांमध्ये हत्तींची संख्या कमी करणे हा आहे. वास्तविक, झिम्बाब्वेमध्ये सुमारे 1 लाख हत्ती राहतात. मात्र, येथील उद्यानांमध्ये केवळ 55 हजार हत्ती ठेवण्यासाठी जागा आहे. त्याचबरोबर दुष्काळामुळे देशातील नागरिक आणि हत्ती यांच्यात संतुलन राखण्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहे, म्हणूनच हत्तींना मारण्यात येत आहे. गेल्या वर्षी झिम्बाब्वेमध्ये हत्तींच्या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी झिम्बाब्वेमध्ये 1988 मध्येही हत्तींची कत्तल करून त्यांचे मांस विकण्यात आले होते. (हेही वाचा: Bill Gates: भारतात कुपोषित बालकांच्या संख्येत घट; मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्सकडून कौतुक)
हत्तींच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेले झिम्बाब्वे अनेक वर्षांपासून हत्ती आणि त्यांचे दात विकण्यासाठी युएन कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एन्डेंजर्ड स्पीसीज (CITES) कडून परवानगी मागत आहे. या मागणीत झिम्बाब्वेशिवाय बोत्सवाना आणि नामिबियाचाही समावेश आहे. जगातील हत्तींची सर्वात मोठी लोकसंख्या बोत्सवानामध्ये राहते. यानंतर झिम्बाब्वेचा क्रमांक लागतो. झिम्बाब्वेमध्ये 5 हजार कोटी रुपयांचे हत्तींचे दात आहेत. मात्र, त्याच्या व्यापारावर बंदी आहे. अशा परिस्थितीत हत्तीचे दात विकण्याची परवानगी मिळाल्याने येथील नागरिकांना कमाईचे दुसरे साधन मिळू शकते.