Queen Elizabeth II (Photo Credits: Wikimedia Commons)

जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राजवाड्यात हत्यारे घेऊन प्रवेश केला. ब्रिटीश राणी एलिझाबेथ ख्रिसमस साजरा करण्यासाठी विंडसर कॅसल येथे पोहोचल्या, त्यावेळी ही घटना घडली. हा हल्लेखोर जसवंत सिंह चैल 19 वर्षांचा असून 1919 मधील अमृतसर हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी राणीला मारण्यासाठी आला होता, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्याला मानसिक आरोग्य कायद्यान्वये ताब्यात घेतले आहे. द सनच्या वृत्तानुसार, लंडन पोलीस त्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करत आहेत. जसवंत सिंगला वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

या घटनेबाबतचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये हल्लेखोर जसवंत सिंह बाणांनी सज्ज दिसत आहे. जसवंत सिंहने ख्रिसमसच्या दिवशी सकाळी 8:06 वाजता स्नॅपचॅटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. जसवंतने आपला आवाज लपवण्यासाठी फिल्टरचा वापर केला. त्याने हुडी आणि मास्क घातला आहे. त्याचा ड्रेस स्टार वॉर्स चित्रपटापासून प्रेरित असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, 'मला माफ करा. मी जे केले त्याबद्दल आणि जे करणार आहे, त्याबद्दल मला क्षमा करा. मी राणी एलिझाबेथची हत्या करणार आहे. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडात मारल्या गेलेल्यांचा हा बदला आहे.’ (हेही वाचा: ब्रिटनच्या प्रसिद्ध मॉडेलचे तिच्या पुरुष चाहत्यांना अनोखं ख्रिसमस गिफ्ट, ओन्ली फॅन्स पेजवर देणार दिवसभर मोफत सेवा)

व्हिडीओमध्ये तो पुढे म्हणतो, ‘ज्यांच्यावर वांशिक भेदभाव केला गेला त्यांचा हा बदला आहे. मी भारतीय शीख आहे. माझे नाव जसवंत सिंग चैल होते, आता माझे नाव डार्थ जोन्स आहे.’ संशयित हा साउथॅम्प्टन येथील आहे. मात्र, राणीच्या महालात सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे नाव पोलिसांनी जाहीर केलेले नाही. महालातील सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती आणि व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती एकच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, दोघांकडेही धनुष्य-बाण आढळले आहेत.

दरम्यान, तरुण ज्या हत्याकांडासाठी राणीचा बदला घेऊ इच्छित होता तो, 1919 मधील जालियनवाला बाग हत्याकांड आहे. यामध्ये 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटीश सैन्याने शेकडो आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 379 आंदोलक मारले गेले आणि सुमारे 1200 जखमी झाले. योगायोग असा की ज्या दिवशी राणीच्या राजवाड्यातून हा तरुण पकडला गेला, त्याच दिवशी क्रांतिकारक उधम सिंगची जयंती होती. त्यांनी या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी परदेशात एका इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली होती.