पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Photo Credit: Twitter)

पाकिस्तानमध्ये (Pakistan) महिला क्रिकेटरसोबत विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. महिला खेळाडूच्या तक्रारीवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) कारवाई केली आहे. मुलतान झोनचे प्रशिक्षक नदीम इक्बाल (Nadeem Iqbal) यांनी हे कृत्य केले आहे. इक्बाल पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध वेगवान गोलंदाज वकार युनूससोबत खेळले आहे. या महिला क्रिकेटपटूने नदीमवर आरोप केले होते. त्यावर कारवाई करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधी प्रशिक्षकाला निलंबित केले आणि नंतर चौकशी सुरू केली. वकार युनूस ज्या संघाकडून खेळला त्या संघासाठी नदीमने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नदीमने 80 प्रथम श्रेणी सामन्यात 258 विकेट घेतल्या. त्याचबरोबर त्याने 49 लिस्ट ए सामन्यात 65 विकेट घेतल्या. एकेकाळी ते वकारपेक्षा चांगले गोलंदाज मानले जात होते.

पीसीबीने काय म्हटले?

पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने या प्रकरणाला दुजोरा देताना सांगितले की, “आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नदीमने नोकरीच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केले आहे की नाही हे आमचे तपास पथक शोधून काढेल. आम्ही गुन्हेगारी तपास करू शकत नाही. पोलीस हे करतील."

काय म्हणाली पीडित महिला?

पीडितेने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. पीडितेने सांगितले की, ती काही वर्षांपूर्वी पीसीबी महिला चाचणीत भाग घेण्यासाठी मुलतानला गेली होती. नदीम तिथे उपस्थित असलेल्या अनेक प्रशिक्षकांपैकी एक होता. व्हिडिओ जारी करताना पीडितेने सांगितले की, "त्याने मला संघात निवडून बोर्डात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तो माझ्या जवळ आला. तो माझे लैंगिक शोषण करायचा. त्यात त्याने काही मित्रांचाही समावेश केला. माझा व्हिडिओ बनवून मला ब्लॅकमेल केले. (हे देखील वाचा: Prophet Muhammad Row: नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याबाबत भारत सरकारच्या निर्णयावर शोएब अख्तरची मोठी प्रतिक्रिया)

यासिर शाहवरही झाले होते आरोप 

पाकिस्तान क्रिकेटमध्ये असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2014 मध्ये मुलतानमधील एका खासगी क्रिकेट क्लबच्या अधिकाऱ्यांवर पाच तरुण महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. गेल्या वर्षी पाकिस्तानी कसोटी संघाचा फिरकी गोलंदाज यासिर शाह याच्यावरही एका तरुणीने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यासिरवरील आरोप वगळण्यात आले, मात्र त्याच्या मित्राविरुद्धचा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे.