
पश्चिम कॅनडातील (Western Canada) ब्रिटिश कोलंबियामध्ये (British Columbia) शनिवारी सुमारे 30,000 लोकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, केलोना शहर परिसरातील जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग (Wildfires) लागल्याने वणवा भडकला. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्यांची घरे खाली करुन सुरक्षीत पणे बाहेर काढण्यात आले. त्याबाबत आदेशही देण्यात आले.
ब्रिटिश कोलंबियाचे आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री बोविन मा यांनी माहिती देताना सांगितले की, मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अद्यापही 36,000 लोक निर्वासनाच्या प्रतिक्षेत आहेत. सध्यास्थीतीत तीस हजार लोकांनाच बाहेर काढण्यात यश आले आहे. वातावरण आणि हवामानाचा अंदाज घेऊन निर्णय घेतले जात असल्याचेही ते म्हणाले.
जंगलात वणवा भडकलेले केलोना सुमारे 150,000 लोकसंख्या असलेले शहर आहे. वणव्यामुळे आग आणि धुराचे लोट आसमंतात पसरले. परिणामी शहर परिसर अंधुक झाला. तसेच मोठ्या प्रमाणावर धुरही आल्यामुळे अनेक नागरिकांचा श्वास गुदमरला. महिला, लहान मुले आणि वृद्धांना मोठ्या प्रमाणावर या समस्येचा सामना करावा लागला. जंगलाला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर झाडे आणि जमीन जळाली. परिणामी त्या ठिकाणची जैवविविधता नष्ट झाली.
जंगलातील आग किंवा वणवा या नावाने ओळखल्या जाणार्या आगी, अनियंत्रित आणि वेगाने पसरणार्या आगी आहेत. नैसर्गिक वातावरणात, प्रामुख्याने जंगले, गवताळ प्रदेश आणि इतर वनस्पती-समृद्ध भागात अशा प्रकारच्या आगी लागतात. ही आग अत्यंत विध्वंसक असू शकते, ज्यामुळे इकोसिस्टम, मालमत्ता आणि मानवी जीवनांचे लक्षणीय नुकसान होते. जंगलातील आग ही एक जटिल नैसर्गिक घटना आहे. जी पर्यावरणीय, हवामान आणि मानवी घटकांच्या संयोगाने प्रभावित होते. हवामानातील बदल, विशेषतः, आग प्रज्वलन आणि प्रसारासाठी अनुकूल परिस्थितीची वारंवारता आणि तीव्रता वाढवून जंगलातील आगीचा धोका वाढवू शकतो.
जगलंनांना आग लागण्याचे प्रमाण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या आगीसाठी नैसर्गिक कारणे तर आहेतच. त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर मानवी कारणे देखील आहेत. अभ्यासकांच्या मते अलिकडील काही वर्षांमध्ये जंगलाला लागणाऱ्या आगी किंवा भडकणारे वणवे या पाठिमागे प्रामुख्याने मानवी कारणच आहे.