President Joseph Biden On Hawaii Wildfire: हवाई जंगल वणवा अद्यापही कायम आहे. जंगलाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न कुरुच आहे. दरम्यान, आगीमध्ये होरपळून आणि जखमी होऊन घडलेल्या मृत्यूचा आकडा वाढतच आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 17 जणांच्या नव्या मृत्यूसह एकूण मृतांची संख्या 53 झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joseph Biden) यांनी हवाई जंगलाला लागलेल्या आगीबद्दल गुरुवारी एक निवेदन दिले. त्यामध्ये त्यांनी ही आग म्हणजे 'मोठी आपत्ती' असल्याचे घोषीत केले आहे. जंगलातील आगीचा फटका बसलेल्या पीडितांना 8 ऑगस्टपासून नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक ती मदत दिली जाईल.
जंगलात आग लागून झालेले नुकसान आणि सद्यास्थिती याबाबत माउ काउंटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्न सुरु आहेत. आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. हा आकडा वाढण्याची भीती आहे. दरम्यान, माऊ बेटावरून बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) 14,000 हून अधिक लोकांना जंगलात लागलेल्या आगीमुळे स्थलांतरित करण्यात आले आहे.
हवाई पर्यटन प्राधिकरणाच्या हवाल्याने सीएनएनने दिलेल्या वृत्ताचा दाखला देत वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे की, सुरक्षेचा उपाय म्हणून गुरुवारी उशीरपर्यंत साधारण 14,500 नागरिकांना सुरक्षीत स्थळी हालवले जाण्याची शक्यता आहे. आज शुक्रवार आहे. आतापर्यंत किती नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले याबाबतच्या माहितीची प्रतिक्षा आहे.
व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे की, “आज, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, जूनियर यांनी घोषित केले की हवाई राज्यात एक मोठी आपत्ती निर्माण झाली आहे. 8 ऑगस्टपासून सुरू झालेल्या वणव्यामुळे प्रभावित झालेल्या भागात राज्य आणि स्थानिक पुनर्प्राप्ती प्रयत्नांना पूरक म्हणून फेडरल मदतीचे आदेश देण्यात आले आहेत.
व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार बिडेनने जाहीर केलेल्या मदतीमध्ये तात्पुरत्या गृहनिर्माण आणि घरांच्या दुरुस्तीसाठी अनुदान, विमा नसलेल्या मालमत्तेचे नुकसान भरून काढण्यासाठी कमी किमतीची कर्जे आणि लोक आणि व्यवसाय मालकांना आपत्तीच्या प्रभावातून सावरण्यासाठी इतर कार्यक्रमांचा समावेश आहे.