West Nile Virus in US: 7 राज्यांमध्ये पसरला धोकादायक असा 'वेस्ट नाईल व्हायरस'; अर्धांगवायूसह होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या सविस्तर
डास (Photo Credits: Pixabay)

डास (Mosquitoes) चावण्यामुळे मलेरिया, झिका विषाणूसारखे अनेक आजार होतात. आता अमेरिकेमध्ये (US) डासांमुळे वेस्ट नाईल व्हायरसचा (West Nile Virus) धोका वाढत आहे. सध्या अमेरिकेच्या किमान सात राज्यांमध्ये डासांमुळे होणार्‍या वेस्ट नाईल व्हायरसची प्रकरणे समोर आली आहेत. सर्वसाधारणपणे हा आजार अमेरिकेत वर्षाच्या या काळात डोके वर काढतो. बेस्ट लाइफच्या अहवालानुसार आर्कान्सा, इलिनॉय, आयोवा, मॅसेच्युसेट्स, न्यूयॉर्क सारख्या राज्यांमध्ये असे डास आढळले आहेत, जे संभाव्यत: अर्धांगवायूचा रोग पसरवित आहेत. तसेच कॅलिफोर्नियामध्ये या आजारामुळे झालेल्या 2021 मधील पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.

वेस्ट नाईल व्हायरस कुलेक्स डासांद्वारे पसरतो, जो उन्हाळ्यात अधिक सक्रिय असतो. नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडियाच्या मते, केरळमध्ये मे 2011 मध्ये तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोमच्या उद्रेक दरम्यान, क्लिनिकल नमुन्यांमध्ये वेस्ट नाईल व्हायरसची उपस्थिती आढळली होती. त्यानंतर केरळमध्ये डब्ल्यूएनव्ही एन्सेफलायटीसची प्रकरणे नियमितपणे नोंदवली जात आहेत. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात मे 2019 मध्ये सात वर्षाच्या मुलाचा वेस्ट नाईल तापाने मृत्यू झाला होता.

तपासणीत असे दिसून आले की, वेस्ट नाईल विषाणूने मुलाच्या मज्जासंस्थेवर परिणाम केला ज्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. उन्हाळ्यात वेस्ट नाईल तापाने डासांमुळे होणार्‍या संसर्गाचा धोका वाढतो. डब्ल्यूएनव्ही हा पक्षी आणि डासांमुळे तो मानव, घोडे आणि इतर सस्तन प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो.

वेस्ट नाईल व्हायरसने संक्रमित बहुतेक लोकांमध्ये कोणतीही खास लक्षणे दिसून येत नाहीत. काही लोकांमध्ये हे संक्रमण डेंग्यू किंवा चिकनगुनियासारखे असू शकते. वेस्ट नाईल फिव्हरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, मळमळ, उलट्या, त्वचेवर पुरळ (कधीकधी) यांचा समावेश आहे. जसजशी स्थिती गंभीर होते तसतसे मान भरून येणे,  कोमा, अंग कापणे, स्नायू कमकुवत होणे आणि अर्धांगवायू होऊ शकतो. कधी कधी रुग्णाचा मृत्यूही (10 मध्ये 1) होऊ शकतो. (हेही वाचा: Covid-19 चं उगमस्थान नैसर्गिक, लॅब मधून लीक झाल्याची शक्यता नाही; वैज्ञानिकांचा दावा)

वेस्ट नाईल विषाणूच्या संसर्गासाठी सध्या कोणतीही लस किंवा विशिष्ट अँटीव्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. डासांच्या चावण्यापासून संरक्षण हाच संसर्ग रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. डासांचे चक्र पूर्ण होण्यास 7-12 दिवस लागतात. म्हणून, आठवड्यातून एकदा पाणी साठवणीची भांडी, कंटेनर नीट साफ केल्यास डासांची पैदास होण्याची शक्यता कमी होते. याव्यतिरिक्त, मच्छरदाणी किंवा तत्सम उपायांनी तुम्ही डासांना दूर ठेऊ शकता.