प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) लढाईबाबत भारत पहिल्यापासूनच आक्रमक राहिला आहे. वेळोवेळी अनेक उपयोजना राबवून भारताने काही प्रमाणात या विषाणूवर मात केली आहे. आता कोरोना विषाणूविरूद्धच्या जागतिक लढाईमधील नेतृत्त्व आणि जागतिक बाजारपेठेत कोविड-19 विरोधी लसीचा 'तातडीने पुरवठा' केल्याबद्दल भारताचे राष्ट्रसंघाचे (United Nations) अध्यक्ष अँटोनियो गुटेरेस यांनी कौतुक केले आहे. कोरोना लसीचे 2 लाख डोस दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघाने भारताचे आभार मानले आहेत. यूएन पीसकीपर्ससाठी भारताने कोरोना लस दिली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी शनिवारी ट्विट केले की, 17 फेब्रुवारी रोजीच्या पत्रामध्ये गुटेरेस यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याबद्दल ‘वैयक्तिक कृतज्ञता’ व्यक्त केली.

संयुक्त राष्ट्र संघाने कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारताला ‘जागतिक नेता’ म्हणून संबोधल्याचेही तिरुमूर्ती यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितल्याप्रमाणे, 'सरचिटणीस म्हणाले की, जागतिक साथीच्या विरोधातील प्रयत्नात भारत एक जागतिक नेता होता.' तिरुमूर्ती यांनी ट्विट केलेल्या पत्राच्या एका अंशानुसार गुटेरेस म्हणाले की, दीडशेहून अधिक देशांना महत्वाची औषधे, चाचणी किट, व्हेंटिलेटर आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे देऊन जागतिक साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारत एक ग्लोबल लीडर ठरला आहे.

'जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी दिलेल्या दोन लसींपैकी एक लसीचा विकास आणि उत्पादन करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे जागतिक लस बाजारात मदत झाली आहे. यामुळेच अनेक देशांना लसीचा आवश्यक पुरवठा केला जात आहे,' असे गुटेरेस यांनी म्हटले आहे. भारताने लसीचे दोन लाख डोस भेट म्हणून दिल्याने संयुक्त राष्ट्रांच्या मिशनच्या सर्व पीसकीपर्सना लसीची दोन्ही आवश्यक डोस मिळू शकतील. (हेही वाचा: कोरोना विषाणूविरुद्ध Herd Immunity हे एक Myth आहे; नवीन स्ट्रेन हा अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असू शकतो- AIIMS Director)

युनायटेड नेशन्स पीसकीपिंगच्या म्हणण्यानुसार सध्या जगातील 12 ऑपरेशन्समध्ये एकूण 94,484 कर्मचारी तैनात आहेत. एकूण 121 देशांमध्ये युएन शांती सुरक्षा कार्यात लोक तैनात आहेत, त्यापैकी जास्तीत जास्त भारतीय आहेत. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताने गेल्या आठवड्यापर्यंत जगभरात एकूण 229.7 लाख कोविड लसींचे डोस निर्यात केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, भारत लवकरच ओमान, निकाराग्वा यासह अनेक देशांमध्ये लस पाठवणार आहे. इतकेच नाही तर लवकरच भारत आफ्रिकेत 1 कोटी डोस थावणार आहे. या व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य कर्मचार्‍यांना 10 लाख लस डोस पाठविण्यात येणार आहेत.