भारतात पुन्हा एकदा कोरोना इन्फेक्शनची (Coronavirus) प्रकरणे वाढू लागली आहेत. गेल्या 28 दिवसानंतर कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येनी 14 हजारांचा आकडा गाठला आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक भयानक बातमी समोर आली आहे. भारतातील नवीन कोरोना स्ट्रेन (New Coronavirus Strains) पूर्वीपेक्षा जास्त संक्रमित ठरू शकतो अशी भीती एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले की, भारतात कोरोना विषाणूविरूद्ध हर्ड इम्युनिटी तयार होत असलेली गोष्ट मिथक आहे. कारण असे होण्यासाठी देशातील 80 टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी प्रतिपिंडाचा विकास होणे गरजेचे आहे.
डॉ. गुलेरिया म्हणाले की, महाराष्ट्रात ज्याप्रकारे पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे, ते पाहून आपण म्हणू शकतो की सध्याचा विषाणू हा पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक आहे. ते म्हणाले की, नवीन कोरोना स्ट्रेन हा या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांवरही, ज्यांच्यामध्ये आधीपासून अँटीबॉडीज असल्या तरी हल्ला करु शकतो, महाराष्ट्रातील कोविड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्या मते, राज्यात 240 नवीन कोरोना स्ट्रेन दिसून आले आहेत. या नवीन स्ट्रेनमुळे महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाब या चार राज्यांत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
लसीकरणाद्वारे कोरोना संसर्गाची साखळी तोडून समूहातून हर्ड इम्यूनिटी निर्माण करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. तर ही लस 50 वर्षांवरील किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 27 कोटी लोकांना दिली जाईल. (हेही वाचा: सातारा जिल्ह्यात कोरोनाची नवी प्रजाती; जिल्ह्यामधील अनेक तालुक्यातील ठिकाण हॉटस्पॉट म्हणून जाहीर)
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूमधील बदलांमुळे बर्याच देशांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु त्यांचे परिणाम भारतामध्ये फारसे दिसत नाहीत. इथे विषाणूचे मोठ्या प्रमाणावर सिक्वेंसिंग नाही हे देखील यामागचे कारण असू शकते. सीसीएमबीचे संचालक राकेश मिश्रा म्हणाले की, N440K हा कोरोना विषाणूचा नवीन प्रकार नवीन प्रकार दक्षिण भारतातील राज्यात अधिक पसरत आहे.