Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

New Coronavirus Strain in Satara: सातारा जिल्हयात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. जिल्ह्यात कोरोनाची नवी प्रजाती आढळलेली आहे असून प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यातील शहरी भागचं नव्हे तर ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे खटाव, कोरेगाव, माण, तालुक्यात अनेक ठिकाण कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील चार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील एका कोरोना रुग्णामध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळली आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे.

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरात नाईट कर्फ्यूचा लावण्याचा विचार करत असल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी म्हटलं होतं. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते पहाटेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरु आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. (वाचा - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार सुरु- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार)

दरम्यान, राज्यात शनिवारी 6,281 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच 40 रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 93 हजार 913 इतकी झाली आहे. याशिवाय मृतांचा आकडा 51,753 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 48,439 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच शनिवारी 2567 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील अनेक नेत्यांनी लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात येतील, असं म्हटलं आहे. कोरोना नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.