Vijay Wadettiwar (Photo Credits: FB)

राज्यात मागील काही महिन्यांपासून आटोक्यात आलेली कोरोना व्हायरसची स्थिती आता पुन्हा बिघडत चालली आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे आता अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ABP माझाशी बोलताना दिली. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते पहाटेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरु आहे असेही त्यांनी सांगितले. याबाबत संबंधित जिल्हाधिका-यांशी चर्चा करुन यावर निर्णय घेण्यात येईल असेही ते पुढे म्हणाले.

तसेच राज्यातील एकूणच कोरोनाची स्थिती पाहता लॉकडाऊनची देखील वेळ येईल असे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. त्याचबरोबर "सध्या विरोधक असो किंवा सत्ताधारी सर्वच राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता आता सर्वच पक्षांनी आंदोलनापासून दूर राहिले पाहिजे. नेत्यांनीही अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे" असं देखील विजय वडेट्टीवार यांनी ABP माझाशी बोलताना सांगितले.हेदेखील वाचा- पंढरपूर येथील माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून 1200 पेक्षा जास्त मठ व धर्मशाळांना नोटीस

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 6,281 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 20 लाख 93 हजार 913 वर पोहोचली असून मृतांची संख्या 51,753 वर पोहोचली आहे. सद्य घडीला राज्यात 48,439 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत 2567 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 19 लाख 92 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

दरम्यान ANI च्या ट्विटनुसार, मुंबई शहरात 2749 कोरोना रुग्ण आढळल्याने बीएमसीने तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. त्यात एकूण 71,838 घरं आहेत. अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.