Too Dangerous To Travel: ब्रिटनच्या (United Kingdom) फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (FCDO) ने अलीकडेच पाकिस्तानचा समावेश ब्रिटनच्या नागरिकांसाठी ‘अत्यंत धोकादायक’ (Too Dangerous) मानल्या जाणाऱ्या देशांच्या यादीत केला आहे. जिओ न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. अहवालानुसार, एफसीडीओने नागरिकांसाठी धोकादायक असलेल्या देशांची यादी अद्ययावत केली असून, त्यामध्ये आणखी आठ देश जोडले आहेत. आता प्रतिबंधित देशांची एकूण संख्या आता 24 वर पोहोचली आहे. ब्रिटनने या देशांबाबत इशारा जारी केला आहे.
एफसीडीओने दिलेल्या इशाऱ्यामध्ये गुन्हेगारी, युद्ध, दहशतवाद, रोग, हवामान आणि नैसर्गिक आपत्तींसह पर्यटकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अनेक चिंतेचा उल्लेख आहे. मँचेस्टर इव्हिनिंग न्यूजच्या हवाल्याने जिओ न्यूजने ही माहिती दिली आहे.
आता रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण, सुदान, लेबनॉन, बेलारूस आणि पॅलेस्टिनी प्रदेशांसह संघर्षात सामील असलेले देश या यादीमध्ये जोडले गेले आहेत. ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या देशांमध्ये पाकिस्तानचे सिंध, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, पाक-अफगाण सीमा आणि पीओके हे उच्च जोखमीचे क्षेत्र म्हणून वर्णन केले आहे. यासह यामध्ये अफगाणिस्तान, बुर्किना फासो, मध्य आफ्रिकन रिपब्लिक, चाड, हैती, इराक, इस्रायल, लेबनॉन, लिबिया, माली, नायजर, उत्तर कोरिया, सोमालिया, सोमालीलँड, दक्षिण सुदान, सीरिया, व्हेनेझुएला आणि येमेन यांचा समावेश आहे.
परराष्ट्र कार्यालयाने रेड लिस्टही जारी केली आहे. या रेड लिस्टमध्ये समाविष्ट असलेले देश अशा क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात जेथे ‘अत्यावश्यक असल्यासच’ प्रवास केला पाहिजे. ब्रिटनने भारताला रेड लिस्टमध्ये ठेवले आहे. म्हणजेच ब्रिटिश नागरिकांना अत्यंत आवश्यक असल्याशिवाय भारताच्या काही भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, मणिपूर आणि भारत-पाकिस्तान सीमेचा समावेश आहे. भारतासोबतच इजिप्त, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स आणि सौदी अरेबिया या देशांची नावे रेड लिस्टमध्ये आहेत. (हेही वाचा: MEA Issues Travel Advisory For Iran-Israel: मध्यपूर्वेतील तणाव वाढला; भारताने प्रवाशांना दिला इराण, इस्रायलला प्रवास न करण्याचा सल्ला)
जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, ‘तुम्ही यूकेमधून प्रवास करण्याची योजना आखत असाल तर, ब्लॅक लिस्ट किंवा रेड लिस्टेड देशांमध्ये प्रवास करू नका.’ ब्रिटनने युद्ध, गुन्हेगारी, दहशतवाद, गंभीर आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांसारखे धोके लक्षात घेऊन ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे.