कोरोना व्हायरस (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेले कित्येक महिने संपूर्ण जग जागतिक महामारी कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटाशी लढत आहे. मात्र दिवसेंदिवस या विषाणूचा उद्रेक वाढतच आहे. कोरोना विषाणूचा जन्म भलेही चीनमध्ये झाला असावा, परंतु सध्या अमेरिके (US) मध्ये कोरोना विषाणूचे सर्वाधिक संक्रमित रुग्ण आहेत. आता अमेरिका हा जगातील पहिला देश ठरला आहे, जिथे कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या 1 लाखांवर गेली आहे. आज संध्याकाळी अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 1 लाखाच्यावर गेली. अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ब्रिटनमध्ये झाले आहेत. यूकेमध्ये कोरोनामुळे 37 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेमध्ये ताज्या आकडेवारीनुसार 1,713,654 संक्रमित रुग्णांची नोंद व 100,064 मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये 468,778 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या अमेरिकेतील स्थिती इतकी खराब झाली असूनही, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही परिस्थितीत लॉक डाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा विचार करत आहेत. याचे महत्वाचे कारण, येत्या काही दिवसांत होणारी राष्ट्रपती पदाची निवडणुक हे आहे. अमेरिकेमध्ये लॉक डाऊन लागू करण्यातही टाळाटाळ केली होती व या दरम्यान संक्रमित रुग्णांची संख्या वाढली.

देशात जरी लॉक डाऊन जाहीर केले गेले होते, मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही. सरकारने नियम लादूनही अनेक लोक बाहेर फिरत होते व सामाजिक अंतराचा पूर्ण फज्जा उडाला होता. अमेरिकेत अधिक चाचण्या केल्यामुळे, संक्रमण आणि मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेत 19 जानेवारी रोजी पहिल्यांदा कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली, हा रुग्ण चीनच्या वुहान येथून आला, परंतु इथे कोरोना चाचणी फेब्रुवारीपासून सुरू झाली. 29 फेब्रुवारी रोजी पहिल्या मृत्यूच्या वेळी अमेरिकेत संक्रमित रूग्णांची संख्या सुमारे 1500 होती. (हेही वाचा: ‘कोरोना विषाणूचा दुसरा टप्पा बाकी आहे, लवकरच उद्भवू शकतो Second Peak’; WHO ने दिला इशारा)

दरम्यान संपूर्ण जगाबद्दल पाहायचे तर, सध्या जगात 5,641,025 इतके लोक या व्हायरसने संक्रमित आहेत. एकूण मृत्यूची नोंद 349,707 इतकी झाली असून, 2,407,001 लोक बरे झाले आहेत.