‘कोरोना विषाणूचा दुसरा टप्पा बाकी आहे, लवकरच उद्भवू शकतो Second Peak’; WHO ने दिला इशारा
WHO Logo (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेले चार महिने जगातील अनेक देशांत कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. लॉक डाऊन (Lockdown) आणि इतर काही उपाययोजना वापरून काही देशांती त्यावर मात केली आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सोमवारी, पुन्हा एकदा कोरोना व्हायरसशी संबंधित नवीन चेतावणी जारी केली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की चीन (China), युरोप (Europe) आणि आता अमेरिका (US) मध्ये संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे, परंतु जगभरातील शास्त्रज्ञ सतत 'सेकंड वेव्ह'च्या धोक्याबद्दल इशारा देत आहेत.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, जरी जगाला कोरोनाच्या 'सेकंड वेव्ह'ला सामोरे जावे लागले नाही, तरीसुद्धा असे काही देश आहेत जिथे संक्रमणाच्या घटनांमध्ये वाढ होईल व ‘सेकंड पीक’ (Second Peak) होण्याची शक्यता आहे.

डब्ल्यूएचओच्या आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे संचालक डॉ. माईक रायन (Dr Mike Ryan) यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, ‘जग सध्या कोरोना संसर्गाच्या पहिल्या वेव्हच्या मध्यभागी आहे आणि जगातील बहुतेक भागात या विषाणूचे संक्रमण कमी होऊ लागले आहे. मात्र आणखी काही दिवसांपर्यंत प्रकरणांमध्ये वाढ नोंदविण्यात येईल. आशिया-आफ्रिकेत आणखी प्रकरणे आढळतील.’ रायन पुढे म्हणाले की, ‘पाऊस आणि हिवाळा हे सामान्यत: संसर्गासाठी अनुकूल असतात, यावेळी कोरोना संक्रमणासाठी नवीन बेस पुन्हा तयार होईल.’

डब्ल्यूएचओच्या संसर्गजन्य रोगाचा साथीचा रोग विशेषज्ञ मारिया व्हॅन केरखॉव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या विषाणूबाबत सर्व देशांत हाय अलर्ट असणे आवश्यक आहे. प्रत्येक देशाने या विषाणूच्या चाचण्या वाढवायला हव्यात. ज्या देशांनी संक्रमणावर मात केली आहे, त्यांनाही हा इशारा देण्यात आला आहे. कोविड-19 हा असा एक विषाणू आहे, जो कोणत्याही वेळी पुन्हा उद्भवेल. हिवाळ्यात तर तो आणखी प्राणघातक असल्याचे सिद्ध होऊ शकते.