![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Coronavirus-1-380x214.jpg)
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाने (Covid-19) त्रस्त आहे. एकीकडे, प्रत्येकवेळी एक नवीन व्हेरिएंट लोकांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील कमकुवत करत आहे, तर दुसरीकडे, अमेरिकेत मानवांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एका सुपरबगने (Superbug) संपूर्ण जगाला पुन्हा चिंतेत टाकले आहे. हा जिवाणू सुपरबग गेल्या काही वर्षांत वैद्यकीय शास्त्रासमोर एक मोठे आव्हान म्हणून समोर आला आहे. मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की, जर हा सुपरबग याच वेगाने पसरत राहिला तर दरवर्षी 10 दशलक्ष लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
सध्या या सुपरबगमुळे जगभरात दरवर्षी 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होत आहे. अँटीबायोटिक्स आणि अँटी-फंगल औषधे देखील सुपरबग्सवर परिणाम करत नाहीत, असे लॅन्सेटच्या अभ्यासातून समोर आले आहे. सुपरबग हा जीवाणूंचा एक प्रकार आहे. काही जीवाणू मानवासाठी अनुकूल असतात तर काही मानवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. हा सुपरबग मानवांसाठी घातक आहे. हा जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांचा एक प्रकार आहे. जेव्हा जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी वेळेनुसार बदलतात, तेव्हा औषध त्यांच्यावर परिणाम करणे थांबवते. यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता निर्माण होते.
प्रतिजैविक प्रतिरोधक शक्तीचा उदय झाल्यानंतर, त्या संसर्गावर उपचार करणे खूप कठीण होते. कोणत्याही प्रतिजैविक औषधाच्या अतिवापरामुळे किंवा प्रतिजैविक औषधांचा विनाकारण वापर केल्यामुळे सुपरबग्स तयार होतात. डॉक्टरांच्या मते, फ्लूसारख्या विषाणूजन्य संसर्गाच्या बाबतीत अँटीबायोटिक्स घेतल्यास सुपरबग होण्याची शक्यता जास्त असते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, आपल्या देशात न्यूमोनिया आणि सेप्टिसिमियाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी कार्बापेनेम ही औषधे आता बॅक्टेरियावर कुचकामी ठरली आहेत. त्यामुळे या औषधांच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आली होती.
त्वचेचा संपर्क, जखमा, लाळ आणि लैंगिक संपर्काद्वारे सुपरबग्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतात. सुपरबगचा मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर औषधांचा रुग्णावर परिणाम होणे थांबते. सुपरबग्सवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही, परंतु योग्य पद्धतींचा अवलंब करून ते टाळता येऊ शकते. लॅन्सेटने कोरोना महामारीच्या काळात काही दिवसांपूर्वी सुपरबगमुळे झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला आहे.
अहवालानुसार, 2021 मध्ये, ICMR ने 10 रुग्णालयांमध्ये एक अभ्यास केला आणि असे आढळून आले की, कोरोना विषाणूनंतर लोकांनी जास्त अँटीबायोटिक्स वापरण्यास सुरुवात केली आहे. अँटिबायोटिक्सच्या अतिवापरामुळे सुपरबग्सबाबतची परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या कोविड रुग्णांपैकी 50 टक्क्यांहून अधिक रुग्णांना उपचारादरम्यान किंवा नंतर बॅक्टेरिया किंवा बुरशीमुळे संसर्ग झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. या अभ्यासानुसार, जगात प्रतिजैविकांचा वापर याच दराने वाढत राहिला तर वैद्यकीय शास्त्रासमोर मोठे आव्हान उभे राहील. (हेही वाचा: 'या' देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सुचना)
स्कॉलर अॅकॅडमिक जर्नल ऑफ फार्मसीच्या अहवालानुसार, गेल्या 15 वर्षांत जगभरात प्रतिजैविकांचा वापर 65 टक्क्यांनी वाढला आहे. लोक कोरोना महामारीमुळे घाबरलेले आहेत, त्यात त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होत आहे त्यामुळे आता ते सर्दी-खोकल्यातही अँटिबायोटिक्सचा वापर करत आहेत. यामुळेच सुपरबगचा धोका वाढला आहे. या सुपरबगमुळे अमेरिकेला 5 अब्ज डॉलरचे नुकसान होत आहे. 2021 मध्ये, अमेरिकेतील 10 हून अधिक संशोधनांमध्ये असे आढळून आले की सुपरबग्समुळे अकाली जन्माचा धोका वाढतो. दुसरीकडे, पुरुषांना लघवीशी संबंधित समस्या उद्भवत आहेत. मात्र, मानवांमध्ये त्याच्या दीर्घकालीन दुष्परिणामांवर अजून संशोधन केले जात आहे.