
Earthquake In Pakistan: शनिवारी पाकिस्तानात (Pakistan) अर्ध्या तासाच्या अंतराने दोन तीव्र भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 आणि 5.8 मोजण्यात आली. पहिला भूकंप दुपारी 12.31 वाजता आणि दुसरा भूकंप दुपारी 1 वाजता जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, दुपारी 1 वाजता झालेल्या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होते. जम्मू आणि काश्मीरसह भारतातील इतर काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, भूकंपामुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीची माहिती अद्याप मिळालेली नाही.
तत्पूर्वी, वृत्तसंस्था पीटीआयने राष्ट्रीय भूकंपशास्त्रीय देखरेख केंद्र (एनएसएमसी) च्या हवाल्याने सांगितले की, पहिला भूकंप 12.31 मिनिटांनी झाला. भूकंपाचे केंद्र रावळपिंडीच्या वायव्येस 60 किलोमीटर अंतरावर जमिनीपासून 12 किलोमीटर खोलीवर होते. त्याची तीव्रता 5.5 असल्याचे नोंदवण्यात आले. (हेही वाचा - Nepal Earthquake: म्यानमार-थायलंडनंतर आता नेपाळला भूकंपाचा धक्का; 5.0 रिश्टर स्केल होती भूकंपाची तीव्रता)
भूकंपाचे धक्के पंजाबमधील अट्टोक, चकवाल आणि मियांवाली जिल्हे आणि आसपासच्या भागात जाणवले. याशिवाय खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पेशावर, मरदान, मोहमंद आणि शबकदर येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्ये 2005 मध्ये सर्वात भीषण भूकंप झाला होता, ज्यामध्ये 74,000 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. (हेही वाचा - Earthquake Safety And Emergency Response: भूकंप काळात स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण कसे करावे? घ्या जाणून)
यापूर्वी 9 एप्रिल रोजी तैवानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. केंद्रीय हवामान खात्याने भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी मोजली. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, 5.0 तीव्रतेचा भूकंप ईशान्य किनाऱ्यावर यिलानच्या नैऋत्य-आग्नेयेस सुमारे 21 किलोमीटर (12 मैल) अंतरावर झाला. त्याचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून 69 किलोमीटर (43 मैल) खाली होता.
थायलंड आणि म्यानमारमध्ये विनाशकारी भूंकप -
यापूर्वी 28 मार्च रोजी थायलंड आणि म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे बरीच हानी झाली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत सुमारे 4000 लोकांचा मृत्यू झाला आहे. 7.7 तीव्रतेच्या भूकंपाचा देशाच्या मोठ्या भागांना फटका बसला. यामुळे सहा राज्यांचे मोठे नुकसान झाले. भूकंपामुळे अनेक भागात वीज, टेलिफोन किंवा सेल कनेक्शन खंडित झाले. तथापी, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान झाले.