South Africa Floods: दक्षिण आफ्रिकेत महापूर, 400 जणांचा मृत्यू; 40,000 बेघर; राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय आपत्तीची घोषणा
South Africa Floods | (Photo Credits: YouTube)

दक्षिण अफ्रिकेत महापूरामुळे (South Africa Floods) महाभयंकर स्थिती निर्माण झाली आहे. पूराचा (Floods) फटाक बसून आतापर्यंत 40,000 नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. तर आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 400 नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सर्वात व्यग्र समजल्या जाणाऱ्या डरबन (Durban) बंदराला महापूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या ठिकाणी वाहतूक, वीज आणि जनजीवन ठप्प झाले आहे. जीवानवश्यक वस्तुंचाही तुटवडा जाणवत आहे. डरबन हे दक्षिण अफ्रिकेतील (South Africa) मुख्य बंदर आहे. महापुराचे संकट विचारात घेऊन राष्ट्रपती सिरिल रामफोसा (Cyril Ramaphosa) यांनी राष्ट्रीय आपत्ती (National Disaster) घोषीत केली आहे. किटारपट्टीलगताच प्रदेश असलेल्या क्वाजुलु-नेटल प्रांत (केजेडएन) मध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोविड या जागतीक महामारीमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध हटवल्यानंतर अवघ्या 15 दिवसांंमध्येच राष्ट्रपती रामफोसा यांना राष्ट्रीय आपत्तीमुळे पुन्हा एकदा आणिबाणी घोषीत करावी लागली आहे.

आफ्रिकेत सलग चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे देशात पूरस्थिती निर्माण जाली आहे. राष्ट्रपती राफोसा यांनी हवामान बदल (Climate Change) हा महापूराचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, पाठिमागील आठवड्यात केजेडएनमध्ये प्रादेशिक स्थिती घोषीत करण्यात आली होती. आता मात्र, संपूर्ण डरबनमध्ये आणि देशाच्या इंधनवाहिन्या, अन्नधान्य पुरवठा व्यवस्था या सर्वांनाच महापुराचा फटका बसला आहे. आपत्ती निवारण कक्ष पूरप्रदेशात दाखल झाला असून, मृतदेह ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 400 जणांचे मृतेह सापडले आहेत. (हेही वाचा, Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे प्रत्येक पाचवा माणूस गरिबी आणि उपासमारीचा बळी ठरू शकतो- UN चा मोठा दावा)

राष्ट्रपती रामफोसा यांनी म्हटले आहे की, महापुराचा फटका आणखी काही प्रदेशांना बसू शकतो. ज्यामुळे संबंधित प्रदेशात अन्यधान्य, आणि जीवनावश्यक वस्तंचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. महापुरामुळे अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.