किशोरवयीन (Teenage Boy) मुलाने शाळेत केलेल्या गोळीबारात आठ विद्यार्थी आणि एक सुरक्षारक्षक ठार झाला आहे. ही घटना सर्बियातील (Serbia) मध्य बेलग्रेड (Central Belgrade) परिसरात बुधवारी (3 मे) घडली. अत्यंत थरारक अशा या घटनेत आणखी सहा मुले आणि एक शिक्षकही जखमी झाला आहे. घटनेनंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य राबविले गेले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या किशोरवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर विद्यार्थ्याला पोलिसांनी त्याच्या नावाच्या अद्याक्षरावरुन मिळालेल्या माहितीच्या अधारे अटक केली. या मुलाने आपल्या वडिलांच्या बंदुकीतून गोळीबार केला. महत्त्वाचे असे की, आरोपी हा विद्यार्थी याच शाळेत शिकत होता. त्याचा जन्म 2009 मध्ये झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की त्यांना सकाळी 8:40 च्या सुमारास व्लादिस्लाव रिबनीकर प्राथमिक शाळेत गोळीबार झाल्याची माहिती देणारा फोन आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घटना घडून गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या स्थानिक प्रसारमाध्यमांच्या फुटेजमध्ये पाहायला मिळते आहे की, पोलीस एका संशयीताला पकडून आपल्या कारकडे (पोलीस व्हॅन) घेऊन जात आहेत. जी रस्त्याच्या बाजूला उभी आहे. (हेही वाचा, Shocking: डोअरबेल प्रँक करणाऱ्या तीन अमेरिकन अल्पवयीन मुलांची हत्या; कोर्टाने भारतीय वंशाच्या व्यक्तीला ठरवले दोषी)
सर्बिया आणि बाल्कन प्रदेशात घडलेला हा सामूहिक गोळीबार अत्यंत दुर्मिळ आहे. अलिकडीलील काही वर्षांमध्ये शाळांमध्ये अशी घटना घडल्याची फारसी नोंद कुठेच नाही. या आधी असा प्रकारची घडलेली शेवटची घटना 2013 मध्ये बाल्कन युद्धावेळी घडली होती. ज्यात 13 लोक मारले गेले होते.
दरम्यान, या घटनेकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहणाऱ्या अभ्यासकांनी म्हटले आहे की, देशामध्ये 1990 च्या दशकातील युद्धानंतर किती नागरिकांकडे किती आणि कोणत्या प्रकारची शस्त्रास्त्रे शिल्लक राहिली आहेत याची नेमकी माहिती पुढे आली नाही. ही शस्त्रास्त्रे जमा करुन घेणे अथवा त्याची नोंद ठेवणे आवश्यक असल्याचा इशारा या अभ्यासकांनी वारंवार दिला आहे.