अमेरिकेतील (US) कॅलिफोर्निया राज्यातील एका भारतीय वंशाच्या माणसाला मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्यावर आरोप आहे की, घराची बेल वाजवून खोड्या काढणाऱ्या तीन मुलांची त्याने हत्या केली आहे. आता हा आरोप सिद्ध झाला असून या प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. रिव्हरसाइड काउंटीचा रहिवासी अनुराग चंद्र याला शनिवारी हत्येचा प्रयत्न आणि फर्स्ट-डिग्री हत्येच्या तीन गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले.
ही घटना 19 जानेवारी 2020 रोजी घडली होती. यावेळी काही मुले अनुराग चंद्राच्या घराची बेल वाजवत होती. त्यावेळी अनुरागने एका दिवसात 12 दारूच्या बाटल्यांचे सेवन केले होते. मुलांच्या या चेष्टेमुळे तो हैराण झाल्याचे त्याने सांगितले. तसेच यामुळे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेचीही आपल्याला काळजी वाटत असल्याचा दावा त्याने केला. मुलांनी हा डोअरबेल प्रँक चालूच ठेवल्याने अनुरागला राग अनावर झाला.
त्यानंतर त्याने मुलांचा पाठलाग केला आणि त्यांची टोयोटा प्रियस गाडी रस्त्यावरून खाली पाडली. त्यानंतर ही गाडी टेमेस्कल कॅनियनमधील झाडावर जोरदार आदळली. यामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला तर आणखी तीन जण जखमी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे उपस्थित एकाने साक्ष दिली की चंद्रने मुलांच्या कारला धडक देण्याचा विचार केला नव्हता. अनुरागने सांगितले की, या किशोरवयीन मुलांच्या गाडीवर हल्ला करण्याचा त्याचा कधीच हेतू नव्हता, परंतु समोरील गाडीने अचानक ब्रेक लावल्याने त्याची गाडी मुलांच्या गाडीवर आदळली. (हेही वाचा: टेक्सासमध्ये शेजाऱ्याने 5 जणांची गोळीमारुन केली हत्या, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार)
यातील कार चालक फक्त 18 वर्षांचा होता, जो दोन 13 वर्षांच्या मुलांसह गाडीतून प्रवास करत होता. महत्वाचे म्हणजे 2020 मध्ये झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी चंद्रा याच्यावर आधीच आरोप आहेत.