Russian Plane Crash: 28 लोकांना घेऊन जाणारे रशियाचे An-26 विमान झाले क्रॅश; सर्वांचा मृत्यू झाल्याची शक्यता- Reports
Representational Image (Photo Credits: Youtube Screenshot)

आज सकाळी बातमी आली होती की, 28 जणांना घेऊन जाणारे एक रशियन विमान (Russian Plane) बेपत्ता झाले आहेत. मंगळवारी, प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अनेक रिपोर्ट्समध्ये सांगितले होते की, रशियातील पूर्वेकडील भागातील कामचटका द्वीपकल्पात (Kamchatka Peninsula) सुमारे 28 लोक घेऊन जाणारे रशियन विमान बेपत्ता झाले. टासने (TASS) एका वेगळ्या स्त्रोताच्या हवाल्याने सांगितले की, एएन-26 (An-26) विमानाचा उतरताना एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. आता शोध पथकांना एएन-26 पॅसेंजर विमानाचे अवशेष सापडले आहेत.

रशियन एएन-26 विमान कोसळले असून, या अपघातामध्ये अपघातग्रस्त 28 जणांपैकी कोणीही बचावले नाही, अशी माहिती इंटरफॅक्स आणि आरआयएच्या वृत्तसंस्थांनी बचाव पथकांच्या सूत्रांच्या माहितीनुसार दिली. विमानाचे अवशेष मिळाल्याचे देशाच्या विमानन एजन्सीने एएफपीला सांगितले. तसेच लँडस्केपची भौगोलिक वैशिष्ट्ये पाहता बचाव कार्य अवघड आहे, असेही सांगण्यात आले. विमानात 22 प्रवाशांसह 6 चालक दल सदस्य होते. 22 जणांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

हे विमान अँटोनोव्ह एन-26 ट्वीन इंजिन टर्बोप्रॉप होते. या विमानाने प्रादेशिक राजधानी पेट्रोपाव्लोव्हस्क-कामचस्स्की (Petropavlovsk-Kamchatsky) वरून उत्तर कामचटकातील पालना या गावी जाण्यासाठी उड्डाण घेतले होते. नंतर जमिनीवर उतरण्यापूर्वी 10 मिनिटे त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. गव्हर्नर व्लादिमीर सोलोदॉव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही दुर्घटना खराब हवामानामुळे दृष्यमानात स्पष्टता नसल्याने घडली असावी. त्यावेळी वातावरण ढगाळ होते तसेच धुकेही होते. (हेही वाचा: फिलीपिन्स विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 29 जवानांनी गमावले प्राण)

याबाबत शोध आणि बचाव कार्य चालू आहे. या विमानाचा शोध घेण्यासाठी अनेक जहाजे पाठविली गेली आहेत, अशी माहिती सीएनएनने आपत्कालीन सेवांचा हवाला देत सांगितली. विमानाच्या सुरक्षाबाबींविषयी तपासणी सुरू केली आहे. यामध्ये उल्लंघन आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. ही घटना गेल्या साडेतीन वर्षांतील रशियाची तिसरा मोठी विमान दुर्घटना आहे.