रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध (Russia-Ukraine War) अजूनही सुरु आहे. अजूनही रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करीत आहे. या युद्धाचे परिणाम जागतिक पातळीवर दिसू लागले आहेत. अनेक देशंमध्ये विविध गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. आता युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर या संघर्षामुळे अणुघटना म्हणजेच न्युक्लिअर वॉर (Nuclear War) घडू शकते अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रेडिएशन विषबाधेधापासून संरक्षण करणार्या गोळ्यांची किंमत जवळपास तिप्पट झाली आहे. युरोपियन नागरिक आयोडीन आणि पोटॅशियम आयोडाइड गोळ्या विकत घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
या अँटी-रेडिएशन गोळ्या (Anti-radiation Pills) आहेत, ज्यामुळे आण्विक किरणोत्सर्गाचे शरीरावरील परिणाम कमी होऊ शकतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार फिनलंड, नॉर्वे आणि लक्झेंबर्गमधील फार्मसी अशा गोळ्या विकत आहेत. नाटो अधिकार्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर, गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या अण्वस्त्र दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिल्यानंतर आण्विक हल्ल्याची चिंता वाढली.
युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याने 4 मार्च रोजी युक्रेनमध्ये असलेल्या युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावरही बॉम्बहल्ला केला. त्यावेळी रेडिएशनमध्ये कोणतीही वाढ नोंदवली गेली नाही. युक्रेनने यापूर्वी चेर्नोबिलमधील अणुऊर्जा प्रकल्पातून 'रेडिओएक्टिव्ह क्लाउड' सोडले जाऊ शकते असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर रशिया न्युक्लिअर वॉर सुरू करू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. या युद्धाच्या परिणामांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरु झाली आहे.
Amazon वर, 180 पोटॅशियम आयोडाइड गोळ्यांच्या एका बाटलीची किंमत आता 70 डॉलर झाली आहे, जी काही आठवड्यांपूर्वी 30 डॉलर पेक्षा कमी होती. युरोपसह यूएस मधील नागरिकही याबाबत चिंताग्रस्त आहेत. न्युक्लिअर वॉरबाबत माहिती मिळवण्यासाठी गुगलची मदत घेतली जात आहे. ‘संभाव्य आण्विक धोक्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?’, ‘आयोडाइड आण्विक युद्धात मदत करते का?’, ‘आयोडाइड गोळ्या कुठे खरेदी करू शकतो?’, असे अनेक प्रश्न गुगलला विचारले जात आहेत. गुगलच्या म्हणण्यानुसार, गेल्या सात दिवसांत ‘आयोडाइड अणुयुद्धात मदत करते का’ या प्रश्नाच्या सर्चमध्ये 1,000% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. (हेही वाचा: युक्रेनमध्ये सैन्य पाठविण्यास अमेरिकेचा नकार, जागतिक युद्ध टाळण्यासाठी निर्णय घेतल्याचे दिले कारण)
यू.एस. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार, पोटॅशियम आयोडाइड थायरॉईड ग्रंथीला किरणोत्सर्गी आयोडीन शोषण्यापासून रोखू शकते आणि त्यामुळे संभाव्य धोके टाळले जाऊ शकतात. सीडीसीच्या वेबसाइटनुसार अशा गोळ्या केवळ सार्वजनिक आरोग्य किंवा आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच घेतल्या पाहिजेत. शरीरात किरणोत्सर्गी आयोडीन नसेल आणि तुम्ही अशा प्रतिबंधात्मक गोळ्या घेतल्या तर शरीराला हानी पोहोचवू शकते.