कोरोना विषाणू (Coronavirus) लढण्यासाठी रशियाने प्रथम स्पुतनिक व्ही नावाची लस (Sputnik V Vaccine) तयार केली होती. या लसीचे वितरण अनेक देशांमध्ये झाले आहे. पण आता ज्या कंपनीने ही लस तयार केली आहे, त्या गेमालय नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीवर चोरीचा आरोप आहे. एका अहवालानुसार, यूकेच्या ऑक्सफर्ड/एस्ट्राझेनेका लसीची (Oxford/AstraZeneca Vaccine) ब्लू प्रिंट रशियन हेरांनी चोरली होती व त्यानंतर त्याचा वापर स्पुतनिक व्ही लस तयार करण्यासाठी केला गेला, असा दावा केला गेला आहे.
'द सन' च्या अहवालानुसार, सुरक्षा सूत्रांनी मंत्र्यांना सांगितले की त्यांच्याकडे पुरावे आहेत की, रशियन अध्यक्षीय कार्यालय क्रेमलिन हेरांनी ऑक्सफोर्ड/एस्ट्राझेनेका लस ब्लूप्रिंट चोरली व त्याचा वापर स्वतःच्या लसीची रचना करण्यासाठी केला. असे समजले जाते की, ब्लू प्रिंट आणि महत्वाची माहिती परदेशी एजंटने वैयक्तिकरित्या चोरली होती. व्लादिमीर पुतीन यांनी स्पुतनिक व्ही लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती दिल्यानंतर हा आरोप समोर आला आहे. त्यांनी इतर रशियनांनाही ही लस घेण्याचे आवाहन केले आहे.
अद्याप स्पुतनिक व्ही लस आंतरराष्ट्रीय स्तरावर मंजूर झालेली नाही. असे असूनही, जवळजवळ 70 देशांनी त्याचा वापर मंजूर केला आहे. Covaxin आणि Covishield प्रमाणे, Sputnik V देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. चाचणी निकालांच्या आधारे, स्पुतनिक व्ही ची कार्यक्षमता दर 91.6 टक्के आहे. Sputnik V लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम आतापर्यंत नोंदवले गेले नाहीत. स्पुतनिक व्ही लस ही दोन डोसची लस आहे. या लसीच्या दोन डोसमध्ये 21 दिवसांचे अंतर ठेवले गेले आहे. (हेही वाचा: Russia Plane Crash: रशियातील एल-410 विमानाचा अपघात, 16 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती)
दरम्यान, मॉस्कोमधील दोन रुग्णालये, बर्डेन्को हॉस्पिटल आणि सेचेनोव्ह युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये या लसीची चाचणी घेण्यात आली. यामधील सर्व सहभागी 18 ते 60 वयोगटातील होते. दुसरीकडे, क्रेमलिनने यापूर्वी म्हटले होते की पुतीन यांना मार्च आणि एप्रिलमध्ये या लसीचे दोन डोस मिळाले होते. परंतु याबाबतचा आणखी तपशील उपलब्ध नाही. सरकारकडून पुतीन यांनी ही लस घेतानाचा फोटोही प्रकाशित केला नाही.