जगातील अर्थव्यवस्थांना (World Economy) 2023 मध्ये मंदीचा (Recession) धोका आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी उच्च व्याजदराचा परिणाम अर्थव्यवस्थेला संकुचित करण्यास भाग पाडत आहे. सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने ही गोष्ट सांगितली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेने 2022 मध्ये प्रथमच $100 ट्रिलियनचा टप्पा गाठला पण आता 2023 मध्ये ती ठप्प होईल, कारण धोरणकर्ते महागाईशी लढा देत आहेत. ब्रिटीश सल्लागार कंपनीने वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबलवरील वार्षिक भाषणात हे सांगितले.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सीईबीआरचे संचालक डॅनियल न्यूफेल्ड यांनीही 2023 मध्ये जगात मंदी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, याचे कारण एकच राहील ते म्हणजे, जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांचे धोरणकर्ते महागाई नियंत्रित करण्यात गुंतले आहेत आणि त्यामुळे उच्च व्याजदर अर्थव्यवस्था संकुचित करत आहेत. याच अहवालात म्हटले आहे की, महागाईविरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही आणि 2023 मध्येही व्याजदर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत आयएमएफकडून जी काही माहिती मिळाली आहे ती निराशाजनक आहे. आयएमएफने ऑक्टोबरमध्येच चेतावणी दिली होती की, जगाच्या अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग संकुचित होईल आणि 2023 मध्ये जागतिक जीडीपी 2 टक्क्यांपेक्षा कमी विकास दर गाठण्याची 25 टक्के शक्यता आहे. म्हणूनच याला जागतिक मंदी म्हटले जात आहे. असे असूनही, 2037 पर्यंत जगाचा जीडीपी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे, कारण विकसनशील देश विकसित देशांच्या बरोबरीला येण्याचा प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा: Indian Driver Won Lottery In UAE: छप्पर फाड के! भारतीय चालकास UAE मध्ये तब्बल 33 कोटींची लॉटरी)
अहवालात असेही म्हटले आहे की, पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेश जगाच्या जीडीपीमध्ये एक तृतीयांश योगदान देईल आणि युरोपचा वाटा एक पंचमांश इतका मर्यादित असेल. तसेच 2036 पर्यंत तरी चीन अमेरिकेचा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचा दर्जा काढून घेऊ शकणार नाही. चीनमधील शून्य कोरोना धोरण आणि इतर अनेक देशांशी वाद यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.