सध्या जागतिक स्तरावर मंदीचा (Global Recession) फटका बसल्याने अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. मुख्यत्वे तंत्रज्ञान, बँकिंग क्षेत्रावर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. आयटी क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. आता जागतिक मंदीबाबत एक भीतीदायक डेटा समोर आला आहे. अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि कॅनडा सारख्या देशांमध्ये जोरदार मंदीची शक्यता आहे. मात्र, यामध्ये भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात मंदीची शक्यता शून्य आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या (World of Statistics) आकडेवारीनुसार, मंदीचा सर्वाधिक परिणाम ब्रिटनमध्ये होण्याची अपेक्षा आहे. येथे मंदी 75 टक्के असल्याचा अंदाज आहे. यानंतर, न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे मंदीचा 70 टक्के परिणाम होऊ शकतो. या बाबतीत अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असेल, जिथे मंदीचा प्रभाव 65 टक्के असण्याची शक्यता आहे. फ्रान्समध्येही मंदी येण्याची शक्यता आहे, कारण इथेही आर्थिक टंचाईमुळे अनेक कंपन्यांना फटका बसला आहे. फ्रान्समध्ये 50 टक्के मंदी असू शकते. त्याचबरोबर कॅनडात 60 टक्के, इटलीमध्ये 60 टक्के आणि जर्मनीमध्ये 60 टक्के मंदीचा परिणाम दिसून येईल.
दक्षिण आफ्रिकेत 45% मंदीची शक्यता आहे, तर ऑस्ट्रेलियात 40 टक्के मंदी येण्याची शक्यता आहे. रशियामध्ये मंदीची 37.5 टक्के शक्यता आहे, जपानमध्ये मंदीची 35 टक्के शक्यता आहे, दक्षिण कोरियामध्ये 30 टक्के मंदी अपेक्षित आहे, मेक्सिकोमध्ये मंदीची 27.5 टक्के शक्यता, स्पेनमध्ये ती 25 टक्के अपेक्षित आहे, स्वित्झर्लंडमधील मंदीचा प्रभाव 20 पर्यंत असण्याची शक्यता आहे, ब्राझीलमध्ये 15 टक्के आणि चीनमध्ये 12.5 टक्के मंदीचा अंदाज आहे. (हेही वाचा: जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचे स्थान पुन्हा घसरले; पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या खाली, जाणून घ्या स्थिती)
महत्वाचे म्हणजे जागतिक मंदीच्या अंदाजाच्या आकडेवारीनुसार, भारत हा एकमेव देश आहे जिथे मंदीचा जास्त प्रभाव दिसणार नाही. यासह इंडोनेशियामध्ये मंदीचा प्रभाव फक्त 2 टक्के असे आणि सौदी अरेबियामध्ये हा अंदाज 5 टक्के आहे. हे अंदाज व्यवसायांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी त्यांचे आर्थिक नियोजन करताना महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी फायद्याचे आहेत.