गुडघ्यावर वाकून व्हॅटिकनचे पोप फ्रान्सिस यांनी दक्षिण सुदानच्या नेत्यांच्या पायांचे चुंबन घेतले, व्हिडीओ व्हायरल
Pope Francis Kneels Down & Kisses Feet of South Sudan Leaders (Photo Credits: Video Screengrab/ @VOANews/ Twitter)

पोप फ्रान्सिस (Pope Francis) हे नाव आज संपूर्ण जगात आदराने घेतले, यांनी जेव्हा पोपपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हाच परिवर्तनाचा पाया रोवला गेल्याचे लक्षात आले, आणि त्याला सुरुवातही झाली. पोप झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी चर्चेमध्ये लैंगिक अत्याचार घडल्याची जाहीर कबुली देऊन त्यासाठी संबंधितांची माफी मागितली. त्यानंतर लोकांमध्ये मिसळून, त्यांच्या समस्या जाणून घेऊन, प्रश्नांवर न्याय्य भूमिका घेऊन स्वतःचे परखड विचार मांडण्यास त्यांनी सुरुवात केली. आताही अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे पोप फ्रान्सिस परत एकदा चर्चेत आले आहे. पोप फ्रान्सिस यांनी शांतीची मागणी करत दक्षिण सुदानच्या नेत्याच्या पायाचे चुंबन घेतले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

11 एप्रिल रोजी व्हॅटिकन येथे आफ्रिकी नेत्यांची एक अध्यात्मिक बैठक आयोजित केली होती. यासाठी दक्षिण सुदानचे अध्यक्ष, साल्वा कीर (Salva Kiir) आणि देशाच्या पाच नामित उपराष्ट्रपतींपैकी चार उपस्थित होते. यावेळी 2018 मध्ये झालेल्या शांती कराराची आठवण करून देत, शांती टिकून राहावी यासाठी पोप फ्रान्सिस यांनी आपल्या गुडघ्यावर बसून सर्व नेत्यांच्या पायांचे चुंबन घेतले.

अध्यक्ष साल्वा कीर आणि विरोधी पक्षाचे नेते रीच मुर्तार यांना एकत्र आणण्यासाठी या आध्यात्मिक बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोप म्हणाले, ‘मी माझ्या हृदयापासून तुम्हाला सांगत आहे, शांततेत राहा. तुमच्यामध्ये कदाचित भांडणे असतील, पण ती या ऑफिसमध्ये राहू द्या. नेत्यांनी आणि इतर दक्षिण सुदानी अधिकाऱ्यांनी युद्धविरोधी कामे करत देशात ऐक्य टिकवून ठेवावे. जनतेसमोर, एकमेकांच्या सोबत राहा, देशाचे जनक व्हा.’ (हेही वाचा: 300 धर्मगुरूंनी केले एक हजारहून अधिक लहान मुलांचे लैंगिक शोषण; चर्चसमोरील गंभीर समस्या)

2011 मध्ये दक्षिण सुदानने सुदानमधून स्वातंत्र्य मिळविले. यासाठी फार मोठे युध्द करावे लागले. पाच वर्षांच्या गृहयुद्धमुळे बऱ्याच लोकांनी त्यांचे प्राण गमावले, अनेकजण बेघर झाले तर कित्येकजण भुकेने व्याकूळ होऊन मरण पावले. आता या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पोप फ्रान्सिस प्रयत्न करत आहेत.